मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी फोन टॅपिंगचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाची ( Phone Tapping Case) चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती प्रकरणी चौकशी करून ३ महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे.

राज्यात भाजपची सत्ता असताना माझ्यासह इतर अनेक व्यक्तींचा फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. तसंच याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही नाना पटोले यांनी राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात नुकतीच केली. त्यानंतर राज्य सरकारकडून आता याबाबत चौकशीचा निर्णय घेण्यात आला असून याप्रकरणी तपास करण्यासाठी ३ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

गृहमंत्र्यांना विधानसभेत दिलं होतं आश्वासन
पावसाळी अधिवेशनादरम्यान नाना पटोले यांनी फोन टॅपिंगचे आरोप केल्यानंतर गृहमंत्री यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. ‘माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे फोन टॅप होत असल्याचे सभागृहात सांगितले. ही बाब अतिशय गंभीर आहे. कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅप करण्यासाठी विशिष्ठ कायद्यानुसार गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागते. फोन नंबर द्यावे लागतात. मात्र दुसऱ्याच व्यक्तीचे नाव देऊन नाना पटोले यांचा फोन टॅप झाला असेल तर याची चौकशी होणे गरजेचे आहे,’ असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.

‘या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल व याप्रकरणी जे कोण दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच पुढील अधिवेशनात चौकशीतून समोर आलेली वस्तुस्थिती सभागृहात मांडण्यात येईल,’ असंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, आता या प्रकरणातील चौकशीदरम्यान नेमकी काय माहिती समोर येते, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने स्थापन केलेल्या ३ सदस्यीय समितीच्या अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here