वृत्तसंस्था, नवी दिल्ली

येथील राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात पुढील आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या भारतीय पाककला प्रदर्शनात मांसाहारी पदार्थांचा समावेश असल्यावरून वाद निर्माण झाला आहे. वस्तुसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत कल्पना देण्यात आल्यानंतर या प्रदर्शनातून मांसाहारी पदार्थ वगळण्यात आले असून, कोणाच्याही भावना दुखवल्या जाऊ नयेत, असे कारण अधिकाऱ्यांनी दिले आहे. वस्तुसंग्रहालयात मांसाहारी पदार्थ वर्ज्य असल्याचा ‘अलिखित नियम’ असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, सांस्कृतिक मंत्रालय आणि वन स्टेशन मिलियन स्टोरीज (ओएसएमएस) या खासगी संस्थेने संयुक्तरित्या २५ फेब्रुवारीपासून हे आयोजित केले आहे. मात्र, त्याविषयीचा मजकूर वस्तुसंग्रहालयाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झाल्यानंतर मेन्यूतील मांसाहारी पदार्थांच्या उल्लेखावरून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यामुळे हे पदार्थ वगळ्यात आल्याचे वस्तुसंग्रहालयाचे अतिरिक्त महासंचालक सुब्रता नाथ यांनी सांगितले. ‘प्रदर्शनात मांसाहारी पदार्थ असतील याची कल्पना ओएसएमएसने आम्हाला दिली नव्हती. वस्तुसंग्रहालयात मांसाहारी पदार्थ दिले जात नाहीत. तसा अलिखित नियम आहे. शिवाय ही भावनिक बाब असल्याने आम्ही प्रदर्शनातून मांसाहारी पदार्थ वगण्याच्या सूचना आयोजकांना दिल्या आहेत’, असे नाथ म्हणाले.

‘वस्तुसंग्रहालयात अनेक देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. येथे भेट देणाऱ्यांच्या भावना जपणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळेच येथे आहे’, असेही नाथ यांनी स्पष्ट केले. भारतीय पाककलेत मांसाहारी पदार्थांची रेलचेल असताना प्रदर्शनात त्यांचा समावेश न होणे विचित्र ठरणार नाही का? असे विचारले असता, ‘आम्ही उपस्थितांना त्याविषयी लेखी वा तोंडी माहिती देऊ’, असे त्यांनी स्पष्ट केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here