: चांदुर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथील रहिवासी गिरीजाबाई अन्नाजी आमझरे (७५) यांच्यावर गुरुवारी हल्ला करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. गिरीजाबाई यांचा नातू सुरज प्रल्हाद आमझरे (२९) याने आजीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

ब्राह्मणवाडा थडी येथील रहिवासी गिरीजाबाई अन्नाजी आमझरे (७५) या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या. त्यांचे पती अन्नाजी आमझरे गावातच राहणाऱ्या आपल्या मुलीकडे चहा घेण्यासाठी गेले होते. तर घरातील मुले शेतीत कामासाठी गेली होती. अन्नाजी आमझरे घरी आले असता त्यांना पत्नीचा रक्ताने माखलेला मरणासन्न देह दिसल्याने त्यांना धक्का बसला.

गिरीजाबाई यांच्या गळ्यातील ७ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र चोरण्यासाठी हा हल्ला झाल्याचे लक्षात आले. नातू सुरज प्रल्हाद आमझरे याने नवीन मोबाईल घेण्यासाठी गिरीजाबाई यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यांनी तो नाकारल्याने सुरजच्या मनात राग निर्माण झाला. घरात कोणीही नसल्याचे पाहून सुरज याने आजीवर हल्ला चढवला. आधी आजीचा गळा घोटला. दरम्यान गिरीजाबाई यांनी आरडाओरडा केला. यावेळी सुरजने स्वयंपाक घरातील एका धारदार वस्तूने आजीच्या चेहऱ्यावर सपासप वार केला. यात गिरीजाबाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

असा झाला खुनाचा उलगडा!
गुरुवारी झालेल्या हत्या प्रकरणानंतर पोलिसांनी साध्या वेशात गिरीजाबाई यांच्या अंत्यसंस्कार विधीत हजेरी लावली. यावेळी त्यांनी आमझरे परिवारातील प्रत्येकाच्या हालचाली टिपल्या. यावेळी सुरजच्या हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यावर सुरजकडे चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

दरम्यान, नवीन मोबाइल घेण्यासाठीच आजीवर हल्ला करून मंगळसूत्र चोरले व नंतर नदीकिनारी जाऊन एका दगडाखाली ते लपवून ठेवले, अशी कबुली सुरजने पोलिसांकडे दिली. ब्राह्मणवाडा थडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार दीपक वळवी यांच्यासह पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here