म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत करोना नियंत्रणात येत असला तरीही संकट अद्याप कमी झालेले नाही. मात्र, नागरिकांचे दररोज प्रवासाचे हाल होत असल्याने सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, राज्य सरकार तूर्त त्यास अनुकूल नाही. सध्या पालिकेकडून मुंबईत तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे, अजूनही अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना कार्यालये आणि इतर ठिकाणी सरसकट प्रवेश दिला जात नाही. त्या पार्श्वभूमीवर ज्यांनी लशींच्या दोन मात्रा घेतल्या आहेत, त्यांना लोकलवगळता अन्यत्र सवलत देण्याविषयी पालिकेकडून सकारात्मक विचारविनिमय सुरू आहे. त्याविषयी, १५ जुलैला मंत्रालयात बैठक असून त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

राज्य सरकारने करोना प्रतिबंधक निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले आहेत. स्थानिक पातळीवर करोनाच्या पॉझिटिव्हिटी दरानुसार निर्बंध शिथिल करण्याविषयी निर्णय घेण्यात येतो. सध्या, मुंबईतील पॉझिटिव्हिटी दर दोन टक्के असला तरीही येणारा उत्सवांचा काळ आणि तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याचा विचार करून मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात केला आहे. त्यानुसार, अत्यावश्यक वगळता सर्वसामान्यांना विविध आस्थापना आणि इतर ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे, दररोज घराबाहेर पडणाऱ्यांना प्रवास निर्बंधापासून विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लोकल प्रवासावर निर्बंध असल्याने बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी व खासगी गाड्यांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. दैनंदिन स्तरावर सोसाव्या लागलेल्या अडचणींनी कंटाळलेले आणि संतापलेले नागरिक सरसकट लोकल प्रवासास परवानगी देण्याची मागणी केली जात आहे.

लसीकरणावर भर
मुंबईत आतापर्यंत ५९ लाख २९ हजार जणांनी लस घेतली आहे. त्यापैकी, ४६ लाख ८१ हजार ७८० जणांनी लशींची पहिली मात्रा घेतली आहे. त्याचप्रमाणे १२ लाख ४७ हजार ४१० जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे. त्यामुळे, लशींच्या दोन मात्रा घेतलेल्यांना विविध कार्यालयांसह अन्यत्र प्रवेश देण्यासाठी सवलत देण्याविषयी पालिकेकडून विचार सुरू आहे. त्याबाबत १५ जुलैला मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

निर्बंध अधिक शिथिल करावेत

करोना नियंत्रणात असल्याने राज्य सरकार आणि पालिकेने सध्याचे निर्बंध आणखी कमी करावेत, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. त्यासाठी १५ जुलैच्या बैठकीत मुंबईकरांना आणखी दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. दोन लस मात्रा झालेल्यांना लोकल प्रवास खुला करण्याची सूचना केली जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here