सोलापूर: पोलीस ठाण्यात मुरूम चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मदत करण्यासाठी साडेसात लाखाची लाच घेताना सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शुक्रवार म्हणजे ९ जुलै रात्री उशिरा झाली. पोलीस निरीक्षक संपत नारायण पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे (रा. सोलापूर) असे दोघा लाचखोर पोलीस अधिकार्‍यांची नावे आहेत.

सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुरूम चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील आरोपींना मदत करुन गुन्ह्यातून सही सलामत सुटण्याकरिता सहकार्य करण्यासाठी पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याच्या करवी १० लाख रूपयाची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती साडेसात लाख रूपये देण्याचे ठरले.

त्यावरून तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रारीची खातरजमा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जुना पुना नाका छत्रपती संभाजी महाराज चौकात सापळा लावला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याने पैसे स्वीकारत असताना त्याला रंगेहात पकडले त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत पवार यांच्या सांगण्यावरून आपण त्यांच्यासाठी लाचेची रक्कम स्विकारली असल्याचे कबुल केले. त्यावरून पोलीसांनी पोलीस निरीक्षक संपत पवार यांना शासकीय विश्रामगृहातून ताब्यात घेतले आणि त्या दोघांविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक संपत पवार हे सलगरवस्ती पोलीस ठाण्यात रुजू झाल्यापासून वादग्रस्त ठरलेले होते. स्थानिक आमदारांशी भररस्त्यात वाद घातला. त्यातच लॉकडाऊनमध्ये अनेक नागरीक तसेच व्यापार्‍यांना त्रास देत वसुली केली होती. त्याचबरोबर खाजगी सावकारांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या सोबत ही आर्थिक व्यवहार केले होते. याबाबतच्या तक्रारी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे गेल्या होत्या परंतु त्यांनीही संपत पवारांकडे कानाडोळा केला होता. त्यामुळे संपत पवार यांचे धारिष्ठ्य वाढले त्यातूनच ते लाचखोरीच्या गुन्ह्यात अडकले आहेत. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या संजीव पाटील आणि कविता मुसळे यांच्या पथकाने केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here