मोदी सरकार एकीकडे एकदिवसातल्या लसीकरणाच्या विक्रमाचा गाजावाजा करीत असताना, दुसरीकडे देशात लशींच्या तुटवड्याअभावी केंद्रांवर लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. लशींअभावी महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेनं अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत लसीकरणाबाबत माहिती दिली आहे.
वाचाः
आज १० जुलै रोजी मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. तसंच, ११ जुलै रोजी साप्ताहिक सुट्टी म्हणून लसीकरण बंद राहिल, असं ट्वीट मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे. तसंच, लसीकरण प्रक्रियेच्या पुढील सूचना आम्ही देत राहू, असं मुंबई पालिकेनं म्हटलं आहे. त्यामुळं शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी लसीकरण बंद राहणार आहे.
दरम्यान, मुंबईत आतापर्यंत ५९ लाख २९ हजार जणांनी लस घेतली आहे. त्यापैकी, ४६ लाख ८१ हजार ७८० जणांनी लशींची पहिली मात्रा घेतली आहे. त्याचप्रमाणे १२ लाख ४७ हजार ४१० जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे.
नाशिकमध्ये लसीकरणाचा खोळंबा
मुंबईबरोबरच नाशिक, औरंगाबाद शहरातही लस तुटवडा असल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकमध्ये लशीचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद राहील असे फलक आठवड्यातून किमान तीन-चार दिवस लावण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणांवर ओढावते आहे. आज ना उद्या लस मिळेल या आशेने नागरिक लसीकरण केंद्रावर जात आहेत. परंतु, लसीकरण केंद्र बंद असल्याने व लस केव्हा उपलब्ध होईल, याची निश्चित माहिती मिळत नसल्याने नागरिकांना निराश होऊन माघारी परतावे लागते आहे.
वाचाः
औरंगाबादमध्येही लस तुटवडा
करोना प्रतिबंधासाठीच्या लशींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे तब्बल सत्तर हजार नागरिक औरंगाबाद शहरात लशीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती पालिकेतून मिळाली आहे. दरम्यान लशींचा साठा प्राप्त न झाल्यामुळे आज, शनिवारी (१० जुलै) कोव्हिशील्ड लस मिळणार नाही, त्यामुळे लसीकरण बंद राहणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times