स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून लवकरच राजकीय रणकंदन निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलांमध्येही त्याचे प्रत्यंतर जाणवले आहे. तसेच, अजूनही करोनाचे संकट पूर्णपणे मावळलेले नाही. अशावेळी मुंबईत पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये अपेक्षित असलेल्या पालिका निवडणुकीविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. देशातील सर्वात श्रीमंत पालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई पालिकेच्या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. त्यामुळेच या निवडणुकीच्या नियोजनाचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर असते.
आगामी निवडणुकीसाठीही महापालिकेने पूर्वतयारी सुरू केली आहे. पालिका निवडणुकीसाठी पालिकातंर्गत निवडणूक विभाग कार्यरत आहे. त्या विभागाकडून निवडणुकीसंदर्भात नियोजन आणि सर्व जबाबदारी पार पाडली जाते. सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार विभागवार केंद्रांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. मुंबईतील विभागांची रचना लक्षात घेता लोकसंख्या, घनता आदी घटकांचा विचार करून केंद्रांची संख्या वाढेल. त्यामुळेच सध्याच्या आठ हजार मतदान केंद्रांमध्ये तीन हजार केंद्रांची वाढ केली जाणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ते कर्मचारी नेमण्याचेही काम सुरू झाले आहे. त्यासह मतदान केंद्रांचेही सर्वेक्षण केले जात आहे. एका मतदान केंद्रावर साधारण १,२०० मतदार असून तिथे करोनाच्या दृष्टीने सुरक्षित वावर राखण्यासाठी केंद्रांमध्ये वाढ केली जात आहे. त्याठिकाणी एका केंद्रावर कमाल ८०० मतदार असतील, अशी रचना केली जाण्याची शक्यता आहे.
करोना उपाययोजना – सुरक्षित वावर राखण्यासाठी केंद्रांमध्ये वाढ – एका केंद्रावर १२०० ऐवजी कमाल ८०० मतदार असतील
मुंबईतील विभागांची रचना लक्षात घेता लोकसंख्या, घनता आदी घटकांचा विचार करून केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त,
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times