मुंबई: भीमा कोरेगाव हिंसाचार व नक्षवाद्यांशी संबंधांच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या ८४ वर्षीय फादर (Stan Swamy) यांच्या मृत्यूचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेनेचे खासदार () यांनी या निमित्तानं केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘८४ वर्षांचा एक गलितगात्र म्हातारा राजशकट उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय?,’ असा बोचरा सवाल राऊत यांनी सरकारला केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये राऊत यांनी स्टॅन यांच्या मृत्यूच्या अनुषंगानं लेख लिहिला आहे. या लेखातून त्यांनी मोदी सरकारच्या वृत्तीवर व न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘कम्युनिझमच्या विविध प्रवाहांशी आपले मतभेद आहेत. माओवाद, नक्षलवाद हे भयंकर प्रकार आहेत. पण माओवाद्यांचा राजकीय पक्ष, संघटना, सत्ता, व्यवस्था जगात अनेक ठिकाणी आहे. ते सर्व लोक कश्मीरातील अतिरेक्यांपेक्षा भयंकर आहेत हे मान्य केले तरी ८४ वर्षांच्या विकलांग, हतबल स्टॅन स्वामींच्या मृत्यूचे समर्थन होऊ शकत नाही. स्टॅन स्वामींची तुरुंगात हत्याच झाली,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

वाचा:

‘जगभरातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी ८४ वर्षांच्या स्टॅन स्वामींना जामीन द्यावा यासाठी विनंती केली. संयुक्त राष्ट्रानेही विनवणी केली. पण पाण्याचा ग्लास उचलून तोंडासही लावू न शकणाऱ्या फादर स्वामींना शेवटी तुरुंगातच मारण्यात आले. एल्गार परिषद हे एक जहर पसरवणारे थोतांडच होते, त्याचे समर्थन कोणी करू नये. पण त्यानिमित्ताने नंतर जे घडविण्यात आले ते ‘मुस्कटदाबी’चे षड्यंत्रच म्हणावे लागेल,’ असा आरोपही राऊत यांनी केला आहे. फादर स्टॅन स्वामी, कवी वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा सर्व लोक एका विशिष्ट विचारसरणीचे आहेत. साहित्य, लिखाण, कविता यातून ते विद्रोह व्यक्त करतात. पण त्यातून राज्य उलथवले जाईल काय, अशी शंकाही राऊत यांनी व्यक्त केली आहे.

‘स्टॅन स्वामी हे झारखंडच्या आदिवासी भागात सामाजिक कार्य करीत होते. त्यांचे सारे जीवन गरीब, वंचितांना समर्पित होते. ते माओवादी विचारांचे होते की नक्षलवादी हा तपासाचा भाग आहे. पण महाराष्ट्रातील तुरुंगातही ते कैद्यांच्या मानवाधिकारविषयी लढत होते. त्यांना जामिनावर सोडावे अशी विनवणी अनेकांनी केली, पण हा ८४ वर्षांचा आंधळा, बहिरा, गलितगात्र म्हातारा बाहेर आला तर राज्य व्यवस्थेस सुरुंग लावील असे ‘एनआयए’ वारंवार कोर्टात सांगत राहिले व आपली न्याय व्यवस्था स्टॅन स्वामींपेक्षा जास्त गलितगात्र होऊन त्या म्हाताऱ्याच्या तिरडीची व्यवस्था करत बसली, हेच सत्य आहे,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

वाचा:

कश्मीरातील देशद्रोही, फुटीरतावादी गुपकार गँगशी पंधरा दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी चर्चा केली. या गँगला आजही कश्मीर स्वायत्त हवेच व ३७० कलम तेथे पुन्हा लागू करा अशी मागणी कायम आहे. काश्मिरातील अतिरेकी दिल्लीत चर्चेला येतात व ८४ वर्षांचे फादर स्टॅन स्वामी तुरुंगात तडफडून मरतात. देशाचे एकही न्यायालय स्टॅन स्वामी यांची साध्या जामिनावर सुटका करू शकले नाही. वृत्तपत्रांची मुस्कटदाबी होत आहे तशी न्याय व्यवस्थेचीही मुस्कटदाबी सुरू झाली आहे काय?,’ असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

हिटलर-मुसोलिनीही तसेच होते!

‘सरकार विरोध व देश विरोध यात फरक आहे. एखाद्या सरकारला विरोध करणे म्हणजे देश उलथवण्याचा कट रचणे असे कुणाला वाटत असेल तर त्यांच्या मनात हुकूमशाहीची बीजे रुजली आहेत. आणीबाणीच्या कालखंडात जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर देश उलथविण्याचा कट रचल्याचा आरोप तेव्हाच्या सरकारने लावला. इंदिरा गांधींनी त्या काळात जॉर्ज यांची प्रचंड भीती घेतली होती. जॉर्ज तेव्हा तरुण नेते होते. इंदिरा सरकार ‘अँग्री यंग मॅन’ जॉर्जला घाबरले. पण आजचे सरकार ८४-८५ वर्षांच्या फादर स्टॅन स्वामी, वरवरा राव यांना घाबरले आहे. जे सरकार ८४ वर्षांच्या अपंग, दुबळ्यास घाबरते, ते सरकार वृत्तीने हुकूमशाही, पण मनाने दुर्बलच असते. हिटलर-मुसोलिनी तसेच होते,’ अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here