अमरावती : यंदा पेरणी आटोपूनसुद्धा पावसाने दडी मारल्याने पीक जगण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करीत आहेत. मात्र, महावितरणकडून वीज कनेक्शन परवानगी न घेताच परस्पर (जोडणी) ओहळ्याचे पाणी सिंचनासाठी वापरणारा शेतकरी हाय व्होल्टेज विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्यामुळे घटनास्थळीच दगावल्याची दुर्दैवी घटना मेळघाटातल्या धारणी तालुक्यातून उघडकीस आली आहे.

उमेश सुखदेव मावसकर (३४, रा. सावऱ्या) असे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. आई, वडील, पत्नी प्रमिला (२८) आणि मुलगा प्रताप (१०) यांच्यासह सहकुटुंब पिकांच्या मशागतीसाठी शेतावरच मुक्कामी राहत होता. यंदा पेरणीनंतर सर्वत्र मान्सूनच्या पावसाने दगा दिल्यामुळे पिकांना वाचवायचे कसे असा यक्षप्रश्न मेळघाटातल्या अनेक शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

उमेशने पिकांसाठी नजीकच्या नाल्यातून सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून पाणी वापरण्याचा बेत आखला. त्यासाठी उमेशने नाल्याच्या काठावर पाणी अडवून त्यावर वीज मोटार पंप बसवला. वीज मोटार मशीन पंपासाठी विद्युत कनेक्शनचा वापर करता यावा म्हणून त्याने तेथून जाणाऱ्या जड विद्युत वाहिनीच्या तारांमधून परस्पर कनेक्शनही जोडून घेतले होते. त्यामुळे उमेश बुधवारी शेतातल्या पिकांचे ओलीत करण्यात मग्न होता.

परंतु, त्याच वेळी वीज मोटार पंपात बिघाड झाला. नादुरुस्त मोटार पंपाची चाचपणी करीत असताना पंपाशी संलग्नित असलेल्या जड विद्युत वाहिनीच्या परस्पर संपर्कात येऊन उमेश जागीच ठार झाला. कुटुंबियांनी उमेशला खासगी रुग्णवाहिकेद्वारे तत्काळ धारणीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. धारणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृताचे शव कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरेंद्र ठाकूर व त्यांची चमू करीत आहे. दरम्यान, उमेशने सिंचनाकरिता महसूल खात्याकडून देण्यात येणारा अधिकृत पाणी परवाना अथवा विद्युत जोडणीसाठी वीज वितरण कंपनीकडून देण्यात येणारी वीज जोडणी या दोन्ही परवानग्या घेतल्या नसल्याची बाब तपासत उघडकीस आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here