अंतिम फेरीचा पहिला सेट चांगलाच रंगला. जोकोव्हिच आणि माटेओ बेरेटिनी यांच्यात चांगलीच झुंज पाहायला मिळाली. पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिच आणि माटेओ बेरेटिनी यांची ६-६ अशी बरोबरी झाली आणि सामना टाय ब्रेकरमध्ये गेला होता. टाय ब्रेकरमध्ये माटेओ बेरेटिनीने अप्रितम खेळत करत जोकोव्हिचवर मात केली आणि पहिला सेट ७-६ असा जिंकला. अंतिम फेरीच्या पहिल्या सेटमध्ये सर्वांनाच जोरदार धक्का बसला होता. कारण जोकोव्हिच हा सामना सहज जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण पहिला सेट जोकोव्हिचने गमावला आणि सामन्याची रंगत वाढली. कारण यावेळी माटेओ बेरेटिनीने पहिला सेट जिंकल्यावर आता विम्बल्डनचा नवा विजेता मिळणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
दुसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने दमदार पुनरागमन केले. जोकोव्हिचने दुसरा सेट ६-४ असा जिंकला आणि आपले आव्हान अजून संपलेले नाही, हे दाखवून दिले. हा सेट जिंकत जोकोव्हिचने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली होती. हा सेट जिंकल्यावर जोकोव्हिचचे मनोबल कमालीचे उंचावलेले दिसले आणि याचा परिणाम तिसऱ्या सेटमध्येही पाहायला मिळाला. कारण तिसऱ्या सेटमध्येही जोकोव्हिचने दमदार खेळ केला आणि हा सेटदेखील ६-४ असा जिंकला. हा सेट जिंकत जोकोव्हिचने सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली आणि त्यामुळेच त्याच्या विजयाची टक्केवारी वाढली. पण चौथ्या सेटमध्ये जोकोव्हिचला माटेओ बेरेटिनीचे कडवे आव्हान मिळाले.
कारण चौथ्या सेटमध्ये माटेओ बेरेटिनीने आक्रमक खेळ केला आणि या सेटमध्ये ३-३ अशी बरोबरी साधली होती. पण त्यानंतर जोकोव्हिचने दमदार खेळ केला आणि जेतेपद आपल्या नावावर केले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times