: करोना संसर्गाच्या काळात तसेच जन्माला येणाऱ्या बाळांच्या आरोग्याच्या संदर्भात वैद्यकीय अंगाने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तरीही मुंबईमध्ये अर्भकमृत्यू कमी झाले आहेत. नवजात मुलांच्या तुलनेमध्ये नवजात मुलींच्या मृत्यूच्या प्रमाणामध्येही घट झाली आहे. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१९च्या तुलनेमध्ये २०२०मध्ये नवजात बालकांमध्ये मृत्यूचे प्रमाण २३ टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यात बालकांचे प्रमाण २१ टक्क्यांनी तर नवजात बालिकांमधील मृत्यूचे प्रमाण हे २५ टक्क्यांनी कमी झाले आहे.

गर्भवती माता कुपोषित असल्यास, रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे बाळाच्या वजनावर तसेच शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतात. जन्माला आल्यापासून चार वर्षे वयापर्यंत अतिसारामुळे क्षीण स्वरूपाच्या रोगप्रतिकारशक्ती, विविध प्रकारचे संसर्ग ही कारणे अर्भकमृत्यूमध्ये दिसून आली आहेत.

मुंबईमध्ये २०१९मध्ये १९३६ बालकांची तर १४९४ नवजात बालिकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. एकूण ३४३० इतके मृत्यू त्या वर्षात झाल्याची नोंद आहे. २०२०मध्ये नवजात अर्भकांच्या मृत्यूमध्ये १५३५ बालकांचा तर १११४ बालिकांचा समावेश होता. एकूण २६४९ इतक्या मृत्यूंची नोंद झाली आहे. या दोन्ही वर्षांचा तुलनात्मक अभ्यास केला असता २०२०मध्ये हे प्रमाण बालकांमध्ये २१ टक्क्यांनी (आकडेवारीत ४०१) तर मुलींमध्ये २५ टक्क्यांनी (३८०) इतके असून एकूण २३ टक्क्यांनी ( आकडेवारी ७८१) इतके कमी झाल्याचे दिसून येते.

महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी, पालिका रुग्णालयांमध्ये अनेकदा शेवटच्या क्षणी प्रसूतीसाठी गर्भवतींना आणले जाते. हे प्रमाण पूर्वीच्या तुलनेमध्ये आता कमी झाल्याचे दिसून आले आहे, असे सांगितले. तसेच करोनाकाळामध्ये गर्भवतींनी स्वत:ची अधिक काळजी घेतल्यामुळेही हे प्रमाण कमी झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

नियम, कायद्यांचा प्रभाव

गर्भामध्ये मुलींना मारून टाकण्याच्या प्रकारांवर करण्यात येणारी कारवाई, सोनोग्राफी करण्यासंदर्भातील कडक नियमावली, पीसीपीएनटीडी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा एकत्रित परिणामही नवजात अर्भकांचे मृत्यू कमी होण्यासाठी उपयोगी पडल्याचे वैद्यकीय निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

प्रभागनिहाय अर्भकमृत्यूचा सर्वाधिक आकडा हा एफ दक्षिण या प्रभागात दिसून आला आहे. येथे ४०२ नवजात बालक तर ३१२ नवजात बालिकांचा म्हणजे ७१४ मृत्यूंची नोंद झाली आहे. सी आणि जी उत्तरमध्ये अवघे चार इतके मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. एफ दक्षिण या प्रभागात अनेक रुग्णालयांचा समावेश असल्यामुळे येथे अर्भकमृत्यू अधिक प्रमाणात होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुलनात्मक घट
२०१८मध्ये नवजात बालक व बालिकांच्या मृत्यूची संख्या ३,७२३ इतकी होती. त्यापैकी २०५७ बालके तर १६६६ बालिका होत्या. या वर्षीही एफ दक्षिण, एफ उत्तर आणि ई या प्रभागांमध्ये नवजात बालकांच्या मृत्यूंची संख्या अधिक होती. ती अनुक्रमे ९३२, ४४५ आणि ६५१ इतकी होती.

प्रभागनिहाय आकडेवारी

जानेवारी ते डिसेंबर २०२०

प्रभाग- मृत्यू

ए- ६३

ई- ३६६

एफ दक्षिण- ७१४

एफ उत्तर- ३४८

के पश्चिम – २१६

एन – १६४

एम पूर्व- १२९

एच पूर्व- ७७

एच पश्चिम – ७७

लॉकडाउनच्या काळात घरी राहिल्यामुळे आईला दीर्घकाळ बाळांना स्तनपान देता आले. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सक्षम करण्यासाठी ते अतिशय महत्त्वाचे ठरले.

-स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संज्योत पवार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here