मुख्यमंत्री यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपाठोपाठ आता राज्यसभा पोटनिवडणूकही लांबणीवर टाकण्याचे निश्चित केले आहे. राज्यातील करोनाची दुसरी लाट आणि डेल्टा विषाणूचे कारण पुढे करीत राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्यसभा पोटनिवडणूक करोना साथीत न घेण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पवित्र्यामुळे आघाडीत काँग्रेसची पुन्हा एकप्रकारे कोंडी झाल्याचे बोलले जात आहे.
राज्यातून मार्च २०२०मध्ये राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार राजीव सातव यांचे १६ मे रोजी दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर राज्यसभा सचिवालयाने १९ मे रोजी सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाल्याबाबतची अधिसूचना काढली होती. त्यानुसार ३० जूनला केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र पाठवून राज्यसभा पोटनिवडणुकीबाबत विचारणा केली होती. आयोगाच्या या पत्राला मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी पत्र पाठवून उत्तर दिले.
राज्यात करोनाची साथ सुरू असून, दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. केंद्रीय आरोग्य विभागाने करोना नियंत्रणाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्या सूचना लक्षात घेता सध्याच्या करोना साथीत पोटनिवडणूक घेणे योग्य होणार नाही, असे पत्रात नमूद केले आहे. तथापि, आयोगाने उचित निर्णय घ्यावा, असेही सरकारच्या वतीने या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात राज्यसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता मावळली आहे.
कमी कालावधी मिळणार
राज्यसभेची जागा जास्तीत जास्त एक वर्षासाठी रिक्त ठेवता येते. दिवंगत राजीव सातव यांची मुदत मार्च २०२६ मध्ये संपणार होती. त्यामुळे सातव यांच्या जागी राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या सदस्याला पोटनिवडणूक जेवढी लांबेल तेवढा राज्यसभा सदस्यत्वाचा कमी कालावधी मिळणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times