मुंबईः मुंबईत करोना नियंत्रणात येत असला तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानं तूर्तास मुंबई लोकलवर (Mumbai Local) निर्बंध कायम राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, दुकानदारांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसऱ्या लाटेत मुंबईत करोना संसर्गानं थैमान घातलं होतं. या संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्बंध लावण्यात आले होते. आता मुंबईतील संसर्ग नियंत्रणात असून मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात असूनही तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं पालिकेनं सावध पावलं उचलत आहेत. मुंबईत सध्या दुकानांसाठी सकाळी सात ते संध्याकाळी ४पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा आहे. मात्र, यावेळेवर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळं लवकरच दुकानांच्या वेळांबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

१५ जुलैला महापालिकेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सरकारी व खासगी कार्यालयात १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती व दुकानं सुरु व बंद करण्याच्या वेळा यासह अन्य निर्बंध शिथील करण्याची घोषणा करण्यात येऊ शकते. त्यामुळं मुंबईतील दुकानदारांना मोठा दिलासा मिळू शकतो, अशी माहिती काकणी यांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबई लोकलसाठी मुंबईकरांना अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे. पालिकेनं तसे संकेतही दिले आहेत. लोकलबाबत मुंबईबरोबरच संपूर्ण एमएमआर क्षेत्राची परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल. मोठ्या प्रमाणात इतर जिल्ह्यातील लोक मुंबईत येत असतात. त्यामुळं मुंबईतील नागरिकांना संसर्ग होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळं मुंबई लोकलबाबत अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल. तसंच, टास्क फोर्स कोणता सल्ला देणार याचीही प्रतीक्षा करावी लागणार आहे, असं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं आहे.

मागील बैठकीत सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी की नाही याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. आता पुढील बैठकीत सरकारने आम्हाला याविषयी विचारणा केली तर आम्ही नक्कीच योग्य तो सल्ला देऊ. यावर अंतिम निर्णय तर सरकारलाच घ्यायचा आहे, असं टास्क फोर्सचे सदस्य राहुल पंडित यांनी म्हटलं आहे.

निर्बंध अधिक शिथिल करावेत
करोना नियंत्रणात असल्याने राज्य सरकार आणि पालिकेने सध्याचे निर्बंध आणखी कमी करावेत, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. त्यासाठी १५ जुलैच्या बैठकीत मुंबईकरांना आणखी दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. दोन लस मात्रा झालेल्यांना लोकल प्रवास खुला करण्याची सूचना केली जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here