मुंबई : मंत्रिमंडळ विस्तार होऊन काही दिवस लोटल्यानंतरही भाजपमधील अंतर्गत कलह सुरूच असल्याचं चित्र आहे. खासदार ( MP ) यांना मंत्रिपद नाकारण्यात आल्याने समर्थक नाराज झाले आहेत. याच नाराजीतून बीड जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले होते. त्यानंतर हे राजीनाम्याचं लोण अहमदनगरमध्येही पोहोचलं. मात्र आता थेट राजधानी मुंबईतून बसला असून भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस आदिनाथ डमाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

आदिनाथ डमाळे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसंच प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात डावलण्यात आल्यानेच आपण राजीनामा देत असल्याचं डमाळे यांनी स्पष्ट केलं आहे.

‘प्रीतमताई मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचं दिसत आहे. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाजपच्या विस्तारासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. त्याच गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या आणि पक्षविस्तारासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या पंकजाताई मुंडे आणि प्रीतमताई मुंडे यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. हे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सहन होणारे नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत मी माझ्या चिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. तरी आपण त्याचा स्वीकार करावा,’ असं आदिनाथ डमाळे यांनी चंद्रकांत पाटलांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच्या सर्व तालुकाध्यक्षांनी तसंच इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपला राजीनामा पाठवला आहे. हे सर्व राजीनामे घेऊन बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष मुंबईकडे रवाना झाले असून मंगळवारी त्यांची भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत बैठक होणार आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजप नेतृत्व काय निर्णय घेणार?
२०१४ मध्ये राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आली आणि मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. त्यानंतर फडणवीस यांनी सातत्याने पक्षातील आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे. २०१९ ची विधानसभा निवडणूकही भाजपकडून फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच लढवण्यात आली. या निवडणुकीत भाजप १०५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, मात्र सत्ता स्थापन करण्यात त्यांना अपयश आलं. असं असलं तरीही विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आणि सध्याही राज्यात फडणवीस हेच भाजपचं नेतृत्व करत आहेत. मात्र पंकजा मुंडे यांचं विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाकडून पुनर्वसन करण्यात आलं नाही आणि त्यामुळे मुंडे समर्थकांच्या मनात खदखद निर्माण झाली. त्यातच प्रीतम मुंडे यांनाही मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आल्याने या नाराजीचा उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वाकडून या नाराज समर्थकांची मनधरणी करण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here