रत्नागिरी : कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Kokan Rain Updates) कोसळत आहे. परिणामी अनेक भागात निर्माण झाली आहे. राजापूरमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू असून अर्जुना व कोदवली नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तसंच पूर रेषा ओलांडली गेल्यामुळे प्रशासनकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुन्हा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिल्याने सतर्कतेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल व विविध भागाची पाहणी जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी बनसोडे, तहसीलदार प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी अधिकाऱ्यांसोबत केली आहे. पावसाचा जोर वाढल्यास मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलावरील वाहतुकीस धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेतली जात आहे. पूररेषा ओलांडल्यास प्रशासनाकडून खबरदारीकरता महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात येईल.

वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ
गेल्या काही दिवसांतील सततच्या पावसामुळे रत्नागिरीतील वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुराचे पाणी चिपळूण शहरात शिरण्यास सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून जुना बाजार पूल वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरातील चिंच नाका, वड नाका, नाईक कंपनी परिसरात पुराचे प्रचंड पाणी साचलं आहे.

पावसाचा जोर वाढू लागल्यामुळे चिपळूणकरांसाठी आजची रात्र महत्वाची ठरणार आहे.

संगमेश्वरमध्ये पूरस्थिती; एक जण वाहून गेला
तळकोकणात काल दुपारपासून पावसाचा धुमाकूळ सुरू असून संगमेश्वर, माखजन, लांजा,राजापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गड नदीच्या पूरस्थितीमुळे माखजन,संगमेश्वर बाजारपेठा पाण्याखाली जाऊन खाडी पट्ट्यातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झालं आहे.

राजापूर नगरपरिषद हद्दीतील कोंडेतर पुलाखाली एक जण वाहून गेल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी ही घटना घडल्याचे समजल्यानंतर प्रशासनाकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. जवाहर चौक व बाजारपेठेत पाणी भरल्याने होडीच्या सहाय्याने नागरिकांना पलीकडे न्यावे लागले असून जवाहर चौक बाजारपेठ पाण्याने वेढली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here