परभणी : परभणी जिल्ह्यातून सलग दोन दिवसापासून होत असलेल्या पावसाने थैमान घातलं आहे. अनेक नद्यांना पुरजन्यस्थिती निर्माण झाली आहे, तर जोरदार पावसाने अनेक ठिकांनी रस्ते वाहून गेल्याची घटना घडली आहे. परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय राज्यमार्ग 61 वरील पुलाचे काम संथ गतीने सुरू असून, याठिकाणी बनविण्यात आलेला पर्यायी रस्ताही पावसामुळे वाहून गेला आहे.

यामुळे जिल्ह्यात रस्त्याच्या दुतर्फा बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांना, सेलू किंवा सोनपेठ मार्गे पुढील प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ताडबोरगाव ते पेडगाव दरम्यान मागील अनेक महिन्यांपासून हे पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या खालून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, जोरदार पावसाने हा रस्ता वाहून गेल्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे.

दरम्यान, हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा येथे घाट भागांसाठी सुधारित इशाऱ्यानुसार मंगळवारी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. सिंधुदुर्गातही ‘ऑरेंज अलर्ट’ कायम आहे. मंगळवारी मुंबईला दिलेला ‘ऑरेंज अलर्ट’ मागे घेऊन तुरळक ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला. ठाण्यासाठी दिलेला अलर्ट मागे घेण्यात आला आहे. मात्र पालघरचा ‘ऑरेंज अलर्ट’ कायम आहे.

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. या भागामध्ये फारसा पाऊस नसेल, असा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातही मंगळवारी पावसाचे प्रमाण काहीसे नियंत्रणात असू शकेल. सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही फारसा पाऊस नसेल. औरंगाबादमध्ये गुरुवारी, जालन्यामध्ये बुधवार-गुरुवारी, तर परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये सोमवार ते बुधवार या कालावधीत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here