अहमदनगर: निर्बंधाच्या कारणावरून लग्न, इतर कार्यक्रम आणि दारूची दुकानेही सुरू असताना राज्यात धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आल्याबद्दल समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर () यांनी नाराजी व्यक्त केली. करोनासंबंधी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी आपल्या खास शैलीत केले. येथील शाळकरी मुलीवर अत्याचार आणि खुनाच्या घटनेला पाच वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल गावात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.

कोपर्डी आणि परिसरातील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंदुरीकर यांनीही निर्भयाला श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, ‘जोपर्यंत मराठा क्रांती मोर्चाचे नाव या जगामध्ये राहील तोपर्यंत कोपर्डी येथील सर्वांची मुलगी असलेली निर्भया व तिचे नाव राहणार आहे.’

वाचा:

करोनासंबंधीही त्यांनी उपस्थितांचे आपल्या शैलीत प्रबोधन केले. ते म्हणाले, ‘प्रत्येक व्यक्तीला तू कोण आहेस, तुझे अस्तित्व काय आहे, हे दाखवून देण्यासाठी अशा पद्धतीचे आजार पृथ्वीतलावर येत असतात. त्यातून आपण धडा घेतला पाहिजे. यामधून जे जिवंत राहिले आहेत त्यांनी परमेश्वराचे नामस्मरण करावे. करोनामुळे संपूर्ण जग हादरले आहे. या महामारीमध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तरीही यामधूनही शहाणपण कोणाला आल्याचे दिसून येत नाही. आजही मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांना गर्दी करत आहेत. हा मोठा धोका आहे. दोन लाटा येऊन गेल्या, तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे समाजामध्ये दारूपासून सर्व काही सुरू आहे. परंतु फक्त देवाची प्रार्थना आणि मंदिरे बंद आहेत, याचे वाईट वाटते.’

वाचा:

कोपर्डीच्या घटनेच्या निमित्ताने त्यांनी पालकांनाही आवाहन केले. ते म्हणाले, ‘कोपर्डीतील घटनेनंतर राज्यातील सर्व समाज एकजूट झाला. आता यातून बोध घेऊन सर्व मुलींना स्वसंरक्षणाचे व मनोबल वाढवण्याचे धैर्य प्रत्येक आई-वडिलांनी द्यावे. त्याची खरी गरज आहे. या निर्भयाच्या आईवडिलांनी सर्वस्व गमावले आहे. घटनेला आज पाच वर्ष पूर्ण झाली तरी त्या मातेचा व वडिलांचा चेहरा पाहिल्यावर दुःख काय असते हे लक्षात येते. यातील नराधमांना अजूनही प्रत्यक्ष शिक्षा झाली नाही, हे आपल्या सर्वांचे दुर्दैव आहे. केवळ भाषणे करून श्रद्धांजली वाहून त्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना न्याय मिळणार नाही तर त्यासाठी सरकारने देखील आता पुढाकार घेण्याची गरज आहे,’ असेही इंदुरीकर म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here