: पारनेर तालुक्यात करोना रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने राज्यभर चिंता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीतही स्थानिक पातळीवर ग्रामस्थ कसे बेजबाबदारपणे वागत आहेत, याचे एक उदाहरण आज पाहायला मिळाले. ५० लोकांसाठी परवानगी घेऊन सुमारे ३०० लोकांच्या उपस्थितीत एक लग्न सोहळा सुरू होता. याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार ज्योती देवरे तेथे गेल्या. त्यांनी उपस्थितांना खडेबोल सुनावत मंगल कार्यालय चालकाला दहा हजार रुपयांचा दंड केला.

कोविड केअर सेंटरमधील सेवा आणि उपक्रमांसाठी चर्चेत आलेला पारनेर तालुका करोनाची लाट ओसरत असताना वेगळ्या अर्थाने चर्चेत आला आहे. इतरत्र लाट ओसरत असताना जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पारनेर तालुक्यात मात्र नगर जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. आजही तालुक्यात सर्वाधिक १३६ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध कडक केले आहेत. २१ गावांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. इतरत्रही गर्दीचे कार्यक्रम घेण्यास बंधने आहेत.

निर्बंध लागू असतानाही पारनेरजवळ गणपती फाटा येथील गौरीनंदन मंगल कार्यालयात सुमारे ३०० लोकांच्या उपस्थितीत थाटामाटात विवाह सोहळा सुरू होता. यासाठी ५० व्यक्तींची परवानगी घेण्यात आली होती. तो नियम पाळण्यात आला नाही. गर्दी होऊ नये, ही जबाबदारी मंगल कार्यालय चालकावर सोपविण्यात आलेली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार देवरे स्वत: पथकासह तेथे गेल्या. तेथे नियमापेक्षा जास्त गर्दी तर होती, अनेकांनी मास्कही लावलेले नव्हते. त्यामुळे देवरे यांनी तेथील माईक हातात घेऊन सर्वांनाच खडे बोल सुनावले.

लोकांच्या अशा बेफिकीर वागण्यामुळेच करोनाचा संसर्ग परसत असून त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, गर्दी होण्यास मंगल कार्यालय चालकास जबाबदार धरून दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापुढे असा प्रकार पुन्हा आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल करण्याची तंबीही मंगल कार्यालय चालकाला देण्यात आली. तहसीदारांच्या अचानक झालेल्या एण्ट्रीमुळे आणि खडे बोल सुनावल्याने वऱ्हाडी मंडळीही खजिल झाली. तालुक्यात करोना रुग्णांची संख्या वाढल्याने काही स्थानिकांनी मुंबईकरांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईहून पारनेरला येणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा बैठकीत ते फेटाळून लावले होते. आता प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असताना स्थानिक ग्रामस्थच नजर चुकवून नियम मोडत असल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here