विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत ऊर्फ सोनू गणेश उदासी (३८, रा. मोर्शी) असे शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. ही घटना २५ ऑक्टोंबर २०१७ ला मोर्शी शहरात घडली होती. पीडित १४ वर्षीय मुलगी ही दोन लहान भावांसाठी चॉकलेट आणण्यासाठी गेली असता दुकानाजवळ उभा असलेला प्रशांत उदासीने पीडितेकडे पाहून शिटी वाजविली. त्यानंतर अश्लील इशारा केला. परंतु मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मुलगी घरी जायला निघाली. त्याचवेळी प्रशांतने मुलीचा दुचाकीने पाठलाग करून काही अंतरावर तिचा हात पकडून प्रेमाची विनवणी केली.
या प्रकारानंतर सदर मुलगी जोरात ओरडली. त्यामुळे तेथे उपस्थित काही नागरिक मुलीच्या मदतीसाठी गेले. नागरिकांनी प्रशांतला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पीडित मुलगी वडिलांसोबत मोर्शी ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचली. तिच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास पूर्ण करुन मोर्शी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मीला जोशी-फलके यांच्या न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता दीपक आंबलकर यांनी सात साक्षीदार तपासले. यापैकी एक किराणा दुकानदार हा साक्षीदार फितुर झाला. इतर साक्षीदारांच्या साक्ष पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपी प्रशांत उदासी याला तीन वर्ष सक्तमजुरी, पाच हजाराचा दंड व दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times