म. टा. प्रतिनिधी, मुंबई: पेट्रोल महागल्याने सीएनजीच्या मागणीत वाढ झाली आहे. ही मागणी वाढताच महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. त्याचवेळी घरगुती वापराचा स्वयंपाकाचा पाइप गॅसही महागला आहे. मंगळवार मध्यरात्रीपासून ही वाढ लागू झाली आहे.
सर्वसामान्यांना अद्यापही लोकलमुभा नसल्याने वाढलेला वाहन वापर व पेट्रोलचे वधारलेले दर, यामुळे गाडीत बसवून घेण्याकडे वाहनचालकांचा कल वाढता आहे. ‘कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस’ची (सीएनजी) मुंबईतील मागणी वाढती आहे. त्याचवेळी ‘वर्क फ्रॉम होम’मुळे घरगुती स्वयंपाकदेखील वाढला आहे. यामुळे ‘पाइप नॅचरल गॅस’चे (पीएनजी) दरही वाढविण्यात आले आहेत.
एमजीएलचा सीएनजी दर ४९.४० रुपये होता. त्यामध्ये २.५८ रुपये प्रति किलोची मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे मंगळवार, १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून सीएनजीचा दर ५१.९८ रुपये प्रति किलो झाला आहे. पीएनजीच्या दरांतही तब्बल पाच रुपये प्रति स्लॅब इतकी वाढ करण्यात आली आहे. पीएनजीच्या पहिल्या स्लॅबचा दर सध्याच्या २५.४६ रुपये प्रति एससीएम यावरून ३०.४० रुपये करण्यात आला आहे, तर दुसऱ्या स्लॅबचा दर ३०.४० रुपयांवरून ३६ रुपये प्रति एससीएम करण्यात आला आहे.
वायू वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्याने परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्च वाढल्याने ही दरवाढ करावी लागल्याचा दावा एमजीएलने केला आहे. या दरवाढीनंतरही सीएनजी हे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे ६७ व ४७ टक्के स्वस्तच असेल. तसेच घरगुती एलपीजीपेक्षा पीएनजी ३५ टक्के स्वस्त असेल, असे एमजीएलचे म्हणणे आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times