मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांचा स्वबळाचा नारा व त्यानंतर आता पाळत ठेवण्याबद्दलच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीतील राजकारण सध्या ढवळून निघालं आहे. भाजपनं ही संधी साधत सरकारमध्ये आलबेल नसल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेनं मात्र नानांच्या बोलण्यावर राज्यातील सरकारचं भवितव्य अवलंबून नाही, असं म्हणत, नानांना फारसं महत्त्व देत नसल्याचं अप्रत्यक्षपणं सुचवलं आहे. ( on )

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं. अर्थात, आपण असं काही बोललो नव्हतो. पाळत ठेवल्याचा माझा आरोप केंद्र सरकारवर होता, असं नानांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, तोपर्यंत त्यांच्या वक्तव्यावरून व्हायचा तो गोंधळ होऊन गेला. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून याच गोंधळावर भाष्य करण्यात आलं आहे.

वाचा:

‘नाना पटोले हे मोकळ्याढाकळ्या स्वभावाचे आहेत. नाना त्यांची मन की बात व्यक्त करतात. सध्याचा अतिजागरूक मीडिया त्यांच्या मन की बातची बातमी करून मोकळा होतो. नाना आधी भाजपमध्ये होते. मोदी यांना चार गोष्टी सुनावून त्यांनी पक्षत्याग केला आणि काँग्रेसची धुरा खांद्यावर घेतली. राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेवर आणायचेच हा विडा त्यांनी उचलला आहे. त्यांच्या हिमतीस दाद द्यावीच लागेल. नानांच्या बोलण्यानं दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? काँग्रेसला तसं बळ मिळालं असेल तर ते बरंच आहे,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘नाना हा विदर्भाच्या मातीतला रांगडा गडी आहे. मनास येईल ते दाणकन बोलतो. भाजपचे चंद्रकांत पाटील वगैरे पुढारीही मनास येईल ते बोलत असतात, पण पाटील हे निरागसतेचं लेणं आहे. ते एक निष्पाप बालक आहेत. त्यांच्या हसण्या-बागडण्याचं महाराष्ट्राला जितकं कौतुक, तितकंच कौतुक नानांच्या रांगड्या बोलीचं आहे. अर्थात महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार या असल्या हसण्या, बोलण्यानं, बागडण्यानं ढिलं पडणार नाही. ते काल मजबूत होतं, आजही आहे आणि उद्यादेखील मजबूत राहील. नानांवर पाळत ठेवून सरकार पाडले जाईल या अंधभक्तीत कोणी राहू नये,’ असा टोलाही शिवसेनेनं विरोधकांना हाणला आहे.

वाचा:

‘शरद पवारांसारखे मोठे नेते नानांना छोटा माणूस मानतात. त्यांच्या बोलण्याकडं लक्ष देत नाही, असं म्हणतात. हीच नानांच्या कार्यकुशलतेची पोचपावती आहे. कधी कधी लहान माणसेही त्यांच्या बोलण्यानं राजकारण ढवळून काढतात. नानांनी तेच केलं. नानांच्या बोलण्यामुळं महाविकास आघाडीत फूट पडल्याचं चित्र विरोधकांनी निर्माण केलं, पण नानांच्या भाषणाचा खरा रोख भाजपवरच होता. भाजपशी आमचं जमणार नाही. भाजपला मदत होईल असं काही करणार नाही, असं नाना सांगत आहेत. त्यावर कोणी लक्ष देत नाही,’ अशी खंतही शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here