वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणात विनोद याला अटक करण्यात आली होती. अचलपूर सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर शिवकुमारने नागपूर खंडपीठात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला होता. अखेर उच्च न्यायालयाने शिवकुमारला जामीन मंजूर करत तात्पुरता दिलासा दिला आहे.
या प्रकरणी न्या. रोहीत देव यांच्या समक्ष सुनावणी झाली. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात काही अधिकाऱ्यांची नावे लिहिलेली होती. याच प्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्याने अचलपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. अचलपूर न्यायालयाने तो अर्ज २० जून रोजी फेटाळला होता. त्यानंतर शिवकुमारने नागपूर खंडपीठात धाव घेत जामीनासाठी विनंती अर्ज दाखल केला.
याप्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेत बुधवारी शिवकुमार याला सशर्त जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना खंडपीठाने शिवकुमारला दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सदर पोलिस ठाण्यामध्ये हजेरी लावावी, पासपोर्ट जमा करावा आणि न्यायालयाच्या परवानगी शिवाय देशाबाहेर जाऊ नये, अशा अटी घातल्या आहेत. शिवकुमारतर्फे अॅड, फिरदोस मिर्झा यांनी काम पाहिले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times