म. टा. प्रतिनिधी, मुंबई
समाजातील सर्व स्तरांतून सर्वांसाठी खुली करण्याची मागणी झाल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने जनहितास्तव एक पाऊल मागे घेण्याची तयारी सुरू केली आहे. लस घेतलेल्या प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय आज, गुरुवारी होण्याची शक्यता आहे. यासाठी अनुकूल असल्याने मुख्यमंत्री यांच्याकडून घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील करोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट होत आहे. लोकलबंदीमुळे रेल्वेतील गर्दी कमी झाली तरी बस-टॅक्सी-रिक्षा प्रवासासाठी होणारी गर्दी ‘जैसे थे’ आहे. किंबहुना वाढलीच आहे. मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने खड्डेमय रस्त्यांवरील वाहतूककोंडीतून सुटका करून घेताना मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडत आहे.

मुंबईतील सर्व प्रभागांचा आढावा घेतल्यास काही प्रभागांमध्ये करोनाबाधितांचे आकडे चढेच आहेत. दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरलेली नाही. तिसरी लाट थोपवण्यासाठी सरसकट निर्बंध करून चालणार नाही. यामुळे पहिल्या टप्प्यात लसीकरण झालेल्या प्रवाशांना मुभा देण्यात येईल. या प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी देण्याबाबत कृती दल, मुंबई महापालिका अनुकूल आहेत. आज, गुरुवारी होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे लसवंत मुंबईकरांबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.

सामान्य मुंबईकर, रेल्वे प्रवासी संघटना, दुकानदार, व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी सर्वांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. लोकाग्रहाचा आदर राखत विरोधी पक्ष आणि राजकीय पक्षांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जनमागणीची ‘री’ ओढली आहे.

ट्रॅव्हल पासची अंमलबजावणी स्थगित

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासची घोषणा केली होती. यासाठी नोंदणी व अन्य प्रक्रिया सुरू असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून टप्प्याटप्प्याने सर्वांसाठी लोकलमुभा देण्यात येणार असल्याचे समजले. यामुळे ट्रॅव्हल पासच्या अंमलबजावणीसाठी तूर्त थांबण्याच्या सूचना वरिष्ठांकडून आल्या आहेत. परिणामी रेल्वे प्रशासनाला ट्रॅव्हल पास अंमलबजावणीची तारीख कळविण्यात आलेली नाही, असे सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here