मुंबई : करोना संसर्गाच्या काळात सक्षमपणे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रश्नम या संस्थेने देशातील प्रमुख १३ राज्यांत सर्वेक्षण घेतले असून त्यात इतर मुख्यमंत्र्यांना मात देत उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय ठरले आहेत. दरम्यान, राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच समोर आलेले हे सर्वेक्षण महाविकास आघाडी आणि शिवसेनेला बळ देणारे ठरणार आहे. पण यावर विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या याच लोकप्रियतेवर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. ‘आमच्या वर्गात एक मुलगा होता. तो कधीच अभ्यास करत नव्हता पण वर्गात पहिला यायचा. यामध्ये एक तर तो हुशार असावा किंवा मग कॉपी करत असावा किंवा मग मॅनेज करून पास होत असावा, असंच मुख्यमंत्र्यांचंदेखील आहे’ अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे.

नंबर वन येण्यासाठी तसं काम करावं लागतं पण दीड वर्षात मुख्यमंत्र्यांनी केलं तरी काय ? असा सवालही यावेळी त्यांनी विचारला. त्यांच्या या टीकेमुळे राजकीय खळबळ उडाली असून याला शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, यावेळी बोलताना संदीप देशपांडे यांनी लॉकडाऊनवरही सरकारवर टीका केली आहे.

राज्यात रुग्णसंख्या कमी झाली आहे, पण तरीही निर्बंध उठवले जात नाहीयेत? ज्यांच्या दोन लसी झाल्या त्यांना निर्बंधातून बाहेर काढा अशी मागणी मनसेने केली असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटले. लसीकरण झाले तरी देखील निर्बंध असतील तर लसीकरणाचा उपयोग काय? असा सवालही त्यांनी विचारला. इतकंच नाही तर मुंबई लोकल सुरू करण्याबाबतही मुख्यमंत्र्यांना मनसेकडून पत्र देण्यात आले. पण मुख्यमंत्र्यांना फक्त घरातच बसून राहायचे आहे. त्यामुळे जनता सरकारवर नाराज आहे. हे वसुली सरकार फक्त हप्ते खोरी करत आहे, असा आरोप यावेळी देशपांडे यांनी केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here