मुंबई : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सध्या देशातील विरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांशी बैठकांचा सपाटा लावला आहे. नुकतीच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली, तर त्या आधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. शरद पवार यांना येत्या राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षांचा चेहरा करण्यासाठी ही मोर्चेबांधणी चालू असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. यावर भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

‘किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा’ अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला देखील प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा सोडलेली दिसते. अशा हस्यास्पद हालचाली सुरू असल्याचा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

इतकंच नाहीतर निवडणुकांचा विचार केला तर लोकसभा, राज्यसभेमध्ये भाजपला मत बहुमत आहे आणि त्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला आहे. यासंबंधी त्यांनी ट्वीटदेखील केलं आहे.

दरम्यान, प्रशांत किशोर यांच्याकडून विरोधकांची मोर्चेबांधणी केली जात आहे, जेणेकरुन आगामी विधानसभा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देता येईल. दरम्यान, भाजपला तिसरी किंवा चौथी आघाडी टक्कर देऊ शकते, यावर आपला विश्वास नसल्याचंही मतही यापूर्वी प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं होतं.

राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर प्रशांत किशोर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आणि विरोधक यांच्यातील राजकीय लढाईला नवं वळण देण्याच्या तयारीत असल्याचं सूत्र सांगतात. भाजप सरकारभोवती याचा पहिला फास पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीत आवळला जाऊ शकतो, असंही सूत्र सांगतात.

काँग्रेस सोबत येणार?
प्रशांत किशोर आणि राहुल-प्रियांका यांच्यातील बैठक ही कोंडी सोडवण्यासाठी असल्याचं बोललं जातं. या बैठकीत जवळपास दोन तास चर्चा झाली. विरोधकांची एकी झाल्यास २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का देता येऊ शकतो, असं प्रशांत किशोर यांचं समीकरण आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here