पुणे: काळ बदललाय तसे गुन्हेगारीचे प्रकारही बदलताहेत. एखादा व्यक्ती गुन्हेगारीकडे वळल्यानंतर त्याच्या डोक्यात काय शिजेल, हे कुणीच सांगू शकत नाही. यातूनच पुण्यात चोरीचा एक वेगळाच आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्याने दुसरं तिसरं कुणी नाही तर बहिणीचं घरच चोरीसाठी निवडलं आणि संधी साधून हात साफ केला…

आजारी आईला भेटण्यासाठी बहिण गावी गेल्याची संधी साधून भावानेच बहिणीच्या घरी चोरी केली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी भावाला अटक केली असून चोरलेला मोबाइल, एटीएम कार्ड असा ४२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

नितीन शिवाजी भाकरे (वय ३५, रा. टाकळी हाजी, माळवाडी, शिरुर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या आई आजारी असल्यामुळे त्या रविवारी त्यांच्या आईला भेटण्यासाठी गावी गेल्या होत्या. त्यावेळी तक्रारदार यांच्या घरी त्यांचा सख्खा भाऊ व त्याच्यासमवेत एक महिला आली होती. त्यावेळी तक्रारदार या घरी नव्हत्या. त्यामुळे आरोपीने त्यांच्या घरातील ३७ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, मोबाइल, घरातील चाव्या, एटीएम कार्ड असा ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. तक्रारदार आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास केला. त्यावेळी भावानेच चोरी केल्याचे उघड झाले. याप्रकरणी तपास महिला पोलिस कर्मचारी सुरेखा साबळे करीत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here