मुंबईः गुरूवार रात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मिठी नदीच्या ()किनाऱ्यावरील क्रांतीनगरात धास्ती पसरली आहे. मुसळधार पावसामुळं (Mumbai Rain)नदीचे पाणी काठोकाठ भरल्यानं वस्तीत पाणी शिरले आहे.

कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगर ही वस्ती बैलबाजार व जरीमरी परिसरात आहे. परंतु बैलबाजार व जरीमरी हे भाग मिठी नदीपेक्षा उंचीवर व तुलनेने दूर आहेत. क्रांतीनगर वस्ती खोलगट भागात असून नदीच्या तीरावरच आहे. यामुळे दरवर्षी पाऊस सुरू झाला की, या वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. तशीच स्थिती सध्या निर्माण झाली आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळं मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीचे पाणी रस्त्यावरुन थेट वस्तीत शिरले आहे.

नदीचे पाणी वस्तीत शिरल्यानं अनेकांच्या घरांत गुडघाभर पाणी साचले आहे. तर, रस्त्यावर नदीचे पाणी आल्यानं नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. नदीशेजारील क्रांतीनगर भागातून नागरिकांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे. या स्थलांतरित नागरिकांना पालिकेच्या शाळेत तात्पुरता आसरा देण्यात आलेला आहे.

मुंबईत रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळं कुर्ला, सायन, गांधी मार्केट परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. मध्य व हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम व पूर्व द्रुतगतीमार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाली होती. दहिसर चेक नाक्यावरही मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूकीचा खोळंबा झाला आहे.

दरम्यान, संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास भरती येणार आहे. त्याकाळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तासांत शहरात व उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तीव्र मुसळधार पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत मुंबई शहरात ६४. ४५ मिमि, पूर्व उपनगरात १२७. १६ मिमि, पश्चिम उपनगरात १२०. ६७ मिमि पावसांची नोंद झाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here