बुधवारी रात्री उशिरा शहरातील गुरुनाथ मंगल कार्यालयाजवळ सतीश नारायण क्षीरसागर (रा. सिद्धार्थ नगर, मोहोळ) आणि त्यांचा मित्र विजय सरवदे यांच्या गाडीचा अपघात झाला. सतीश क्षीरसागर यांचा मृत्यू झाला तर विजय सरवदे हा जखमी झाला. या प्रकरणी राष्ट्रवादीचे संतोष जनार्दन सुरवसे, रोहित उर्फ अण्णा अनिल फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे व टेम्पो चालक भैय्या अस्वले या चौघांविरुद्ध कट करून खुनाचा गुन्हा गुरुवारी मध्यरात्री दाखल करण्यात आला आहे.
सदरचा अपघात झाला नसून घातपात झाल्याची तक्रार करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चार आरोपींपैकी भैया अस्वले याला पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत.
चार महिन्यापूर्वी शहरातील प्रभाग क्रमांक ८ व ९ मध्ये बोगस मतदान नोंदणी झाल्याच्या कारणावरून सिद्धार्थ नगर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते सतीश नारायण क्षीरसागर व विजय सरवदे या दोघांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून सुनावणीत प्रांताधिकार्यांनी बोगस नावे कमी केली होती. त्याचा आरोपींच्या मनात रोष होता. यातून अपघात घडवून आणून खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत मयताचा भाऊ दादाराव क्षीरसागर याने पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times