पायधुनीमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला फेसबुकवरील परदेशी मैत्रिणीने पाठविलेले ‘व्हेलेंटाइन गिफ्ट’ तब्बल तीन लाखांना पडले. या मैत्रिणीने तरुणाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून केवळ सात दिवसांच्या ‘प्रेमा’तून हा गंडा घातला. याप्रकरणी पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळबादेवी येथील भोईवाडा येथे राहणाऱ्या अमित हा तरुण एका पतसंस्थेत नोकरी करतो. ८ फेब्रुवारीला अमितला जय स्मिथ नावाने एका महिलेने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. अमितने ती स्वीकारली. त्यानंतर मैत्रिणीने त्याच्यासोबत मेसेंजर अॅपवर हाय-हॅलो करण्यास सुरुवात केली. तिने अमितकडे मोबाइल क्रमांक मागितला. दोघांमध्ये व्हाट्सअॅप वर चॅट सुरू झाले. याचदरम्यान स्मिथने माझं तुझ्यावर प्रेम जडले आहे, असे सांगितले. अमितही तिच्या प्रेमात पडला. ११ फेब्रुवारीला स्मिथने अमितला संदेश पाठविला, दोन दिवसांनी व्हेलेंटाइन डे आहे. मला पत्ता पाठव, तुला गिफ्ट पाठवायचे आहे, असे या संदेशात म्हटले होते. अमितने सुरुवातीला नकार दिला मात्र नंतर त्याने पत्ता पाठविला. दुसऱ्या दिवशी सोन्याचा पट्टा असलेले घड्याळ, सोन्याची अंगठी, चेन, आय फोन आणि एक जीन्स एका बॉक्समध्ये भरून कुरियरने केल्याचे सांगून तिने अमितला कुरियर ट्रॅकर नंबर पाठवला.
गिफ्टची आतुरतेने वाट पाहणाऱ्या अमितला १७ फेब्रुवारीला फोन आला. नवी दिल्ली येथील कस्टम कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून तुमच्या नावाने पार्सल बॉक्स आला आहे. यामध्ये लाखो रुपयांच्या महागड्या वस्तू असल्याने तुम्हाला ३५ हजार ५०० रुपये चार्जेस भरावे लागतील असे तया व्यक्तीने सांगितले. लाखो रुपयांच्या वस्तूंसाठी इतके पैसे भरण्यास काहीच हरकत नसल्याचा विचार करून अमितने हे पैसे ऑनलाइन पाठविले. यानंतर अमितला पुन्हा फोन आला आणि आणखी ६३ हजार २०० रुपये पाठविण्यास सांगितले. ही रक्कमही त्याने भरली. इतके पैसे भरूनही पार्सल न आल्याने अमितने कस्टम अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्याने आयकर, इन्शुरन्स फी अशी कारणे सांगून एक लाख ८४ हजार ६०० रुपये आणखी घेतले. यानंतरही पैशाची मागणी सुरूच राहिल्याने अमितला संशय आला. म्हणून अमितने स्मिथशी संपर्क केला. तिने ही रक्कम भरण्यास सांगून नंतर मी पैसे देते असे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमित याने पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times