म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

सर्वसामान्य नागरिकांना गंडविण्यासाठी ऑनलाइन भामटयांनी पूर्वीचीच युक्ती पुन्हा वापरण्यास सुरुवात केली आहे. गावाकडील मोकळ्या जागेत बसवून महिना उत्पन्नाचे साधन भासवून फसवणुकीच्या घटना पुन्हा सुरू झाल्या आहेत. पवईतील एका व्यावसायिकाला अशाप्रकारे अडीच लाखांना तर साकीनाका येथील महिलेला ८६ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला.

पवईतील व्यापारी जेझार यांना डिसेंबरमध्ये एका महिलेचा फोन आला. आमच्याकडे एक योजना असून आपल्या मालकीची मोकळी जागा असेल तर त्यामध्ये मोबाइल टॉवर लावून त्याआधारे तुम्हाला दरमहा ४० हजार रुपये भाडे मिळेल, असे या महिलेने सांगितले. घरबसल्या महिना उत्पन्न मिळणार असल्याने जेझार यांनी यासाठी तयारी दर्शवली. महिलेलच्या मागणीनुसार आधारकार्ड, पॅनकार्ड आणि गुजरातमधील दोन एकर जागेची कागदपत्रे पाठवली. काही दिवसांनी जेझार यांना अनुप वर्मा या व्यक्तीने फोन केला. तुमचा प्रस्ताव मंजूर झाला असून विम्याचे ४८ हजार रुपये पाठवा. हे पैसे टॉवर तुमच्या जागेत लागताच परत केले जातील, असे सांगितले. त्यानुसार जेझार यांनी पैसे पाठविले. जेझार यांचा विश्वास बसल्याचे लक्षात येताच वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपये उकळण्यात आले. होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत कुटुंबीय आणि मित्रांना माहिती दिली. ही फसवणूकच असल्याचे कळताच त्यांनी पवई पोलिस ठाण्यात तक्रार केली.

८६ हजार उकळले

अन्य एका घटनेत नवी मुंबईत राहणाऱ्या नंदिनी हिची फसवणूक झाली. या महिलेच्या कुटुंबीयांच्या नावे लातुर जिल्ह्यातील शहाजीण औराद या गावात जमीन आहे. या पडीक जमिनीवर मोबाइल टॉवर बसविल्यास उत्पन्न मिळेल असे काहींनी तिला सांगितले. त्यानुसार नंदिनी हिने गुगल सर्च इंजिनवर शोध घेतला. एका कंपनीच्या नावे असलेल्या मोबाइल क्रमांकांवर तिने संपर्क साधला. मोबाइलवरील व्यक्तीने तिला ३० हजार भाडे आणि ३० लाख रुपये अनामत रक्कम देऊ असे सांगितले. जागेची सर्व कागदपत्रे तसेच, ओळखपत्र नंदिनी हिच्याकडून घेण्यात आली. यानंतर अनामत, विमा, जीएसटी अशी वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून ८६ हजार रुपये घेण्यात आले. एवढे पैसे देऊनही टॉवर लावण्याबाबत काहीच हालचाली होत नसल्याने नंदिनीने अखेर पोलिसांत धाव घेतली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here