मुंबईः ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे वाराणसीला गेले. तेथील बीएचयू, आयआयटी मैदानावर त्यांचे भाषण झाले. तेथे काळे कपडे घातलेल्या लोकांना प्रवेशबंदी करण्यात आली. पोलिसांनी श्रोत्यांच्या तोंडावरील काळे मास्कही काढायला लावले. म्हणजे त्या गर्दीत बरेच लोक मास्कशिवाय बसले. कारण तोंडावरचे काळे मास्क खेचून काढले. पण काळे मास्क काढण्याचे कारण काय?, तर पंतप्रधानांची सुरक्षा, असं चिमटा शिवसेनेनं () काढला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वी वाराणसी दौऱ्यावर होते. तिथे पंतप्रधानांच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र, त्याही पेक्षा चर्चा रंगली ती त्यांच्या सभेची. हाच धागा पकडत शिवसेनेनं पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलं आहे. तसंच, पंतप्रधान मोदींनी योगी आदित्यनाथ यांचं केलेल्या कौतुकावरही शिवसेनेनं हल्लाबोल केला आहे.

वाचाः

‘पंतप्रधानांच्या सभांना यापुढे काळे मास्क चालणार नाहीत, असा अप्रत्यक्ष आदेश पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे. वाराणसीच्या या सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकही त्यांच्या गणवेषात हजर होते. त्या स्वयंसेवकाच्या डोक्यावरच्या काळ्या टोप्याही सुरक्षा रक्षकांनी काढायला लावल्या. पंतप्रधानांनी काही वर्षांपूर्वी मंत्र्यांच्या डोक्यावरची लाल बत्ती काढली. हे काही बरे झाले नाही. आता सुरक्षा रक्षकांनी संघाची काळी टोपी काढली ऐकावे ते नवलच असा हा प्रकार आहे,’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

‘पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही खोट असू नये, पण तोंडावरील मास्क व डोळ्यावरील काळ्या टोप्याही काढायला लावणे हा प्रकार जादाच झाला, असे कदाचित पंतप्रधान मोदींनाही वाटले असेल. मास्कच्या आड आणि काळ्या टोपीखाली दडलंय काय, असा प्रश्न पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेस पडला असावा,’ अशी मिश्किल टिप्पणी सामनातून केली आहे.

वाचाः

सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

सरकारने एकच करावे, एक अध्यादेश काढून काळे मास्क व काळ्या टोप्या यावर बंदीच घालावी. नाही तरी देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात स्वस्त झालाच आहे.

गृहमंत्री मागच्या आठवड्यात अहमदाबादच्या बेजलपूर भागात एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेले. गृहमंत्री शहा यांना ‘झेड प्लस’ दर्जाच्या वरची सुरक्षाव्यवस्था आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या आगमनाआधी स्थानिक पोलिसांनी एक फर्मान जारी केले. या भागात उंच इमारतीत राहणाऱ्या सोसायट्यांना स्थानिक पोलिसांनी आपापल्या घराच्या खिडक्या-दरवाजे बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. अर्थात पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही एक सामान्य प्रक्रिया आहे. या सामान्य प्रक्रियेतूनच मोठय़ा नेत्यांच्या आगमनाविषयी सामान्य लोकांत नाराजीची भावना निर्माण होते. गृहमंत्री शहा यांना देशातील सर्वोच्च दर्जाची सुरक्षाव्यवस्था आहे. गृहमंत्र्यांभोवती ५० सुरक्षा रक्षक कायम तैनात असतात. यात नॅशनल सिक्युरिटी गार्डस्, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप्सचे कमांडो असतातच. शिवाय आयटी बीपी, सीआरपीएफचे जवानही त्यांच्या सुरक्षेत आहेत. इतकी कडेकोट सुरक्षा असूनही लोकांनी दारे-खिडक्या बंद करून घरात बसावे व लाडक्या नेत्यांचे दर्शन घेऊ नये. खिडकीतून अभिवादन करू नये, असे फर्मान काढणे हे जरा जास्तच झाले.

वाचाः

महाराष्ट्रातील काही नेत्यांनाही केंद्रीय सुरक्षा दलाची सेवा पुरवून राज्य व केंद्रात एक दरी निर्माण केली. याचा अर्थ असा की, इतके तगडे व मजबूत नेतृत्व असतानाही देश व जनता सुरक्षित नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील सभांत काळे मास्क आणि काळय़ा टोप्या उतरवण्यात आल्या हे त्या भयाचेच लक्षण नाही काय? अर्थात राष्ट्रीय नेत्यांच्या सुरक्षेत गलथानपणा नको हे मान्य. आपण दोन पंतप्रधान सुरक्षाव्यवस्थेतील हेळसांडीमुळे गमावले आहेत. त्यामुळे ताकही फुंकून प्यावे लागते व काळय़ा टोप्या आपल्या असल्या तरी उतरवाव्या लागतात. कलियुग, कलियुग म्हणतात ते हेच काय?

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here