म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

सीएए, एनआरसी आणि एनपीआरमुळे राज्यातील कोणत्याही नागरिकाचे अधिकार हिरावले जाऊ नयेत, म्हणून पूर्ण काळजी घेतली जाईल आणि त्यावर राज्य समन्वय समिती निर्णय घेईल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना शुक्रवारी आश्वस्त केल्याचे समजते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज प्रथमच भेट घेतली. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर हेही होते. तासभर चाललेल्या या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून मुख्यमंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचे आभार मानले. महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावरच सरकार वाटचाल करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे राज्यातील नेत्यांसोबत उत्तम समन्वय सुरू असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते. ‘आम्ही मन बनवले आहे आणि किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे जात असल्यामुळे कोणालाही समस्या नाही. आमचे सरकार पाच वर्षे चालणार,’ अशी ग्वाही त्यांनी सोनिया गांधींना भेटण्यास जाण्यापूर्वी दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी ”वरून केलेल्या विधानावर काँग्रेसने प्रतिक्रिया टाळली आहे. सोनिया गांधींसोबतची बैठक आटोपून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३०, अब्दुल कलाम मार्गावरील लालकृष्ण अडवाणी यांचे निवासस्थान गाठून त्यांचे आशीर्वाद घेतले.

पंतप्रधान मोदी महाराष्ट्रासोबत

‘आजवर आपण दिल्लीत आलो, पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून प्रथमच आलो. मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधानांशी भेट झाली नव्हती. केवळ फोनवर बोलणे झाले होते. पण आज पंतप्रधानांसोबतच्या भेटीत खूप चांगल्या विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्र राज्य आणि राज्याच्या आवश्यकतांवर चर्चा झाली. महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घडामोडी आपल्या ठिकाणी असल्या तरी देशातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून केंद्राचे महाराष्ट्राला सहकार्य लाभले पाहिजे. राज्यासाठी आणि राज्याच्या हितासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्यात केंद्र सरकार पूर्णपणे सोबत राहील, असे वचन आपल्याला पंतप्रधानांनी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.’

दिल्लीहून परत मुंबईला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे आणि आदित्य यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ६ ए, कृष्ण मेनन या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत सीएए, एनआरसी, या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुद्द्यांसह ‘एनआयए’ने हाती घेतलेल्या एल्गार परिषदेच्या तपासाविषयी चर्चा झाल्याचे समजते. मुंबई आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या समन्वयाविषयीही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

सहा तासांत चार बैठकी आणि पत्रकार परिषद

दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यसभेतील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या १५, सफदरजंग लेन निवासस्थानी दाखल झाले. तिथून त्यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान गाठले आणि परत राऊत यांच्या बंगल्यावर पत्रकार परिषदेला संबोधून पुन्हा सोनिया गांधी यांच्या १०, जनपथला पोहोचले. प्रथमच मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्ली भेटीसाठी दुपारी चार वाजताच्या सुमाराला दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांनी सहा तासात पंतप्रधान मोदी, पत्रकार परिषद, सोनिया गांधी, लालकृष्ण अडवाणी आणि गृहमंत्री अमित शहांसोबत बैठकी घेऊन आपला दौरा रात्री दहा वाजता संपविला आणि अकरा वाजता ते मुंबईला रवाना झाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here