म.टा. प्रतिनिधी, नगरः ‘स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष () यांचा आदेश आहे. यासाठी पक्ष संघटन मजबूत करत आहोत. आगामी मुख्यमंत्री काँग्रेसचा () व्हावा, अशी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची भावना असून संघटन मजबूत करून निवडणुका स्वबळावरच लढत जिंकण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे,’ अशी माहिती काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिली.

ओबीसी आरक्षणासंबंधी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी माळी नगरला आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘केंद्रातील भाजप सरकारमुळेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. ओबीसीला त्यामुळे मोठा फटका बसला असून ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातून एक लाख ओबीसी कार्यकर्ते दिल्लीला जाणार आहेत. तेथे जंतरमंतर मैदानावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाणार आहे. ओबीसीवर झालेल्या या अन्यायास सर्वस्वी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे. या देशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशात विकृत विचारधारा चालवत असून घाणेरडे राजकारण करत आहे. संघाचा केंद्र सरकारच्या आडून देशातील आरक्षण संपवण्याचा डाव आहे. यामुळे ओबीसींसह इतर आरक्षित असणारे सर्व घटक संतप्त झाले आहेत. याचाच उद्रेक होऊन दिल्लीमध्ये न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी जंतर-मंतरवर मोर्चा काढण्याची काँग्रेसची भूमिका आहे.’

ओबीसी आणि काँग्रेस याबद्दल सांगताना माळी म्हणाले, ‘ओबीसी हा काँग्रेसचा मूळ पाया राहिलेला आहे. मात्र मधल्या काळात हा वर्ग आमच्यापासून काही कारणास्तव दुरावला गेला आहे. त्यांना पुन्हा एकदा संघटित करत ओबीसींचे प्रश्न सोडवत काँग्रेसला मजबूत करण्याचे काम आम्ही करीत आहोत. या माध्यमातून ओबीसीतील सर्व समाज घटकांना मुख्य राजकीय प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. बारा बलुतेदार, आलुतेदार यांना देखील ओबीसीच्या माध्यमातून संघटीत करण्याचे काम आम्ही करीत आहोत. राज्यभर संवाद यात्रेच्या माध्यमातून ओबीसींच्या गेलेल्या राजकीय आरक्षणाबाबत महाराष्ट्रभर जागृती करण्याचे काम करीत आहोत. आतापर्यंत २४ जिल्ह्यांचा दौरा पूर्ण झाला असून ओबीसींचे संघटन मजबूत करण्याचे काम राज्यभर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे सुरु आहे. काँग्रेस ओबीसी आरक्षणा बरोबरच मुस्लिम आरक्षण तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील गंभीर आहे,’ असे माळी म्हणाले.

कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी भानुदास माळी नगरला आले होते. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनंत गारदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, अजय मिसाळ, गणेश आपरे, कौसर खान, जरीना पठाण, मंगल भुजबळ, रिजवाना पटेल, सुमन काळापहाड उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here