म. टा. प्रतिनिधी, पिंपरीः हॉटेल आणि वीटभट्टीचा व्यवसाय असणाऱ्या व्यवसायिकाच्या विटभट्टीवर काम करणाऱ्या एका कामगाराने मालकाच्या मुलीला पळवून नेले. त्यास दुसऱ्या कामगाराने साथ दिली. याचा राग अनावर झाल्यानं मालकाने मुलीला आणि तिला पळवून नेणाऱ्या दोघांना शोधून हॉटेलमध्ये बेदम मारहाण केली. यात दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील करंजविहिरे येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ()

बाळू सिताराम गावडे (वय २६), राहुल दत्तात्रय गावडे (वय २८, दोघे रा. आसखेड खुर्द, ता. खेड, जि. पुणे) अशी मृतावस्थेत आढळलेल्या दोन कामगारांची नावे आहेत. हे दोघंही वीटभट्टीवर काम करत होते. या वीटभट्टीचा मालक आणि त्याच्या पाच साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खेड तालुक्यातील करंजविहिरे येथे संशयित आरोपीचे हॉटेल आहे. हॉटेलसमोर त्याची वीटभट्टी आहे. मयत बाळू गावडे आणि राहुल गावडे त्या वीटभट्टीवर काम करत होते. बाळू गावडे याने मालकाच्या २१ वर्षीय मुलीला पळवून नेले होते. त्यासाठी राहुल गावडे याने मदत केली होती. मुलीला पळवून नेल्यानंतर वडिलांना राग अनावर झाला होता. त्यानंतर काही माणसांना हाताशी धरुन वीटभट्टी मालक आणि साथीदारांनी बाळू, राहुल आणि मुलगी या तिघांचा शोध सुरू केला.

वीटभट्टी मालकांनी या तिघांचा शोध सुरू केल्यानंतर तिघे सापडले. त्यानंतर चिडलेल्या मालकानं त्यांना हॉटेलमध्ये आणले व लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघा कामगाराचा मृत्यू झाला. या दुहेरी खून प्रकरणात पोलिसांनी मुलीचे वडील आणि अन्य पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here