मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बँकिंग रेग्युलेटरी अॅक्टमध्ये बदल करण्यात आला असून तो सहकारी बँकांसाठी धोकादायक आहे. याबाबत शरद पवारसाहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चाही केली होती. मात्र या विषयावर भेटून चर्चा करू असे नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर आज प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयावर अधिक चर्चा झाली, असं मलिक यांनी सांगितलं.
वाचा:
नव्या कायद्यानुसार, जे लोक बँकांकडून कर्ज घेतील, त्यांना बँकेचे अडीच टक्के शेअर घेणे बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच, कर्ज परत केल्यानंतर हे शेअर कुणालाही विकण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीला देण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेनं तसे आदेशही काढले आहेत. यापूर्वी हे शेअर बँकेलाच पुन्हा देण्याचा नियम होता. मात्र, अशा पद्धतीने खुल्या बाजारात शेअर विकल्यास सहकारी बँक धनाढ्य लोकांच्या हातात जाण्याची भीती आहे. रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांमुळं सहकारी बँकांच्या स्वायत्ततेवर गदा येत आहे व त्यांचा व्याजदरही अबाधित राहत नाही. हे मुद्दे शरद पवारांनी पंतप्रधानांसमोर मांडले. या चर्चेनंतर केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल, असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला.
वाचा:
पंतप्रधान मोदी यांच्या भेटीआधी शुक्रवारी शरद पवारांच्या आणखी दोन बैठका झाल्या. त्याबद्दलची माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी निवड करण्यात झाली. त्यानंतर गोयल यांनी स्वतः शरद पवारसाहेबांची त्यांच्या ६ जनपथ या निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली. राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी निवड झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांना भेटण्याची परंपरा आहे. सभागृहात सर्व पक्षांचे सहकार्य मिळण्यासाठी अशा भेटी होत असतात. पक्ष सभागृहातील कामकाजात सहकार्य करेल, अशी चर्चा यावेळी दोघांमध्ये झाल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.
वाचा:
देशाचे सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दालनात एक बैठक झाली. या बैठकीला माजी संरक्षणमंत्री म्हणून पवारसाहेब, माजी सरंक्षणमंत्री ए. के. अँटनी आणि लष्करातील प्रमुख अधिकारी देखील उपस्थित होते. देशाच्या सीमेवरील परिस्थितीचे आकलन उपस्थितांना करून देण्यात आले. त्यानंतर राजनाथसिंह यांनी पवार साहेबांकडून काही सूचनाही घेतल्या. या तीन बैठकांखेरीज इतर कुठलीही बैठक झालेली नाही. माध्यमात ज्या काही उलटसुलट बातम्या येत आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही, असं मलिक यांनी सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times