: आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जळगावात आलेल्या तरुणाचा मालवाहू वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. शनिवारी दुपारी २.३० वाजता शिरसोली गावाजवळील आकाशवाणी केंद्रासमोर ही दुर्घटना घडली. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे तासभर मृतदेह रस्त्यावर पडून होता. अखेर एका खासगी वाहनाच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला. संतोष रमेश पाटील (वय ३६, रा. गोंडगाव, ता. भडगाव) असं मृत तरुणाचं नाव आहे.

संतोष पाटील याची आजी मंजुळाबाई मन्साराम पाटील (वय ८५, रा. पंढरपुरनगर, जळगाव) यांचे १६ जुलै रोजी निधन झाले. शनिवारी सकाळी अंत्यसंस्कारासाठी गोंडगाव येथील नातेवाईक चारचाकी वाहनाने जळगावात आले होते. तर संतोष दुचाकीने (एमएच १९ बीए ५४२३) आला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याच्या आजीचे अंत्यसंस्कार पूर्ण झाले. सायंकाळी अस्थीविर्जन करण्यात येणार होते. त्यासाठी संतोष जळगावातच थांबणार होता. मात्र, अचानक निर्णय बदलून संतोष कोणाला काहीच न सांगता भडगावकडे जाण्यासाठी निघाला होता.

संतोषच्या दुचाकीस शिरसोली गावातील आकाशवाणी केंद्राजवळ समोरुन येणाऱ्या मालवाहू वाहनाने (एमएच ०४ युआय ४१७२) जोरदार धडक दिली. या अपघातात संतोषच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या मधोमध संतोष दुचाकीसह पडून होता.

यावेळी एका वाटसरूने संतोषच्या खिशातील मोबाईल काढून एका क्रमांकावर फोन केला. हा फोन पुढे जात असलेल्या चारचाकीत बसलेल्या त्याच्याच एका नातेवाईकास लागला. अवघ्या दहा मिनिटात हे नातेवाईक माघारी येऊन घटनास्थळी दाखल झाले. संतोषचा मृतदेह पाहून कुटुंबियांना मोठा धक्का बसला. यानंतर मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तासभर विनंती केल्यानंतर एका वाहनचालकाने हा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. मृत संतोष याच्या पश्चात पत्नी रत्ना, मुले प्रशांत व युवराज, भाऊ गोरख, आई सरस्वताबाई व वडील रमेश पाटील असा परिवार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here