: राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र बीड जिल्ह्यात काही भागात करोनाचा कहर कायम असल्याने प्रशासनाने पुन्हा निर्बंध कडक (Beed Strict Lockdown) करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील आष्टी, गेवराई आणि पाटोदा या तीन तालुक्यांमध्ये दुकाने खुली ठेवण्याच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसंच नागरिकांच्या हालचालींवरही मर्यादा आणण्यात आल्या आहेत.

आष्टी,पाटोदा आणि गेवराई तालुक्यात उद्यापासून दुकाने फक्त सकाळी ७ ते १२.३० या वेळेत सुरू राहतील. त्यामुळे दुपारी १ नंतर केवळ अत्यावश्यक कारणांसाठी नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी राहील. आवश्यकता नसतानाही दुपारी १ नंतर घराबाहेर पडल्यास कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

शनिवार आणि रविवारी फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. वीकेंडला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट नसलेली दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. या नवीन निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर जारवाई केली जाईल, असा इशारा प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यात सध्या करोना रुग्णांना गृह विलगीकरणाला परवागनी देण्यात आलेली नाही. त्यामुळे करोनाबाधित रुग्ण जर गृह विलगीकरणात असतील तर स्थानिक प्रशासनाने योग्य ती कार्यवाई करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शहरांतील एखाद्या भागात जर करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तर स्थानिक प्रशासनाने त्या भागास कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करावं, असंही प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here