: करोना संदर्भातील निर्बंध असतानाही लोणावळा, खंडाळा आणि मावळातील पर्यटनस्थळी (Tourist Places in Khandala) पर्यटकांची मोठी गर्दी होत होती. या गर्दीमुळे वाढणारा करोनाचा धोका लक्षात घेत राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हाधिकारी यांनी लोणावळा व मावळातील पर्यटनस्थळे व परिसरात शुक्रवारी जमावबंदीचे आदेश दिले. या आदेशाची शनिवारी पोलिस व लोणावळा नगरपालिका प्रशासनासह सबंधित ग्रामपंचायतींनी काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याने लोणावळा व मावळातील सर्वच प्रमुख पर्यटनस्थळे निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळालं.

पोलिसांनी पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास मज्जाव केल्याने माघारी फिरलेल्या पर्यटकांनी लोणावळ्यात गर्दी केली होती. पर्यटकांच्या वाहनांमुळे जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय मार्गावर लोणावळ्यात वाहतूक कोंडी झाली.

पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या भुशी धरण व टायगर, लायन्स, शिवलिंग पॉईंट्सकडे जाणाऱ्या मार्गावर लोणावळा धरणाजवळील नौसेना बाग येथे उभारण्यात आलेल्या चेकनाक्यावर शहर पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या ठिकाणाहून वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांना पुन्हा माघारी पाठवण्यात येत होते.

यामुळे एरवी दरदिवशी विशेषतः पावसाळ्यातील वीकेंडला हजारो पर्यटकांच्या संख्येने गजबजणारे भुशी व लोणावळा डॅम, टायगर, लायन्स, शिवलिंग पॉईंटस या मुख्य पर्यटन स्थळांसह या परिसरातील पर्यटन स्थळे अक्षरशः निर्मनुष्य झाली होती. दूरवरून वाहनांनी आलेल्या पर्यटकांना नायलाजास्तव माघारी फिरावे लागल्याने पर्यटकांचा मोठा हिरमोड झाला.

लोणावळा –खंडाळयानंतर पर्यटकांचे मावळातील आकर्षणाची ठिकाणे असलेल्या कार्ला लेणी, एकविरा देवी मंदिर, भाजे लेणी, भाजे लेणी धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोना, तुंग व राजमाची गड-किल्ले, पवनाधरण व परिसरातील दुधिवरे खिंड, प्रती पंढरपूर दुधिवरे या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर ग्रामीण पोलिस निरिक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here