वाचा:
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात वाद रंगला असून त्यात कोल्हे यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे नाव घेत टीका केल्याने दोन्ही पक्षांत तणाव निर्माण झाला आहे. शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत, असे विधान करणाऱ्या कोल्हे यांच्यावर प्रवक्ते यांनी थेट शब्दांत टीकेचे बाण सोडले आहेत. ‘अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली बहुतेक, तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले. आपण ज्या उद्धव ठाकरे यांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले आहेत. अंगापेक्षा पोंगा जास्त झाला की होते असे!!, अहो कोल्हे ज्या उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली आहेत. किमान त्यांना तरी विसरू नका. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दस्तूरखुद्द शरद पवार सतत उद्धव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत करत राज्य कारभार चालवत आहेत. मग तुम्ही कशाला फार विचार करता, तेवढी तुमची कुवत पण नाही आणि क्षमता पण… दिग्दर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पहा, फार डोके चालवू नका’, असा खरमरीत सल्लाच किशोर कान्हेरे यांनी दिला आहे. अमोल कोल्हे, तुम्ही कलाकार आहात कलाकारच राहा. उगाच राजकारणी बनण्याचे नाटक करू नका, असा इशाराही कान्हेरे यांनी दिला.
वाचा:
काय म्हणाले अमोल कोल्हे?
राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे. मात्र, महाराष्ट्रात आपण एक वेगळी प्रवृत्ती आज अनुभवतो आहोत. ही प्रवृत्ती राज्य पातळीवर अनुभवायला मिळत आहे, हीच प्रवृत्ती शिरूर मतदारसंघातही आहे आणि दुर्दैवाने जुन्नर तालुक्यातही तीच स्थिती आहे. वयस्कर नेत्याने असे पोरकटपणाने वागावे, याचेच मला आश्चर्य वाटते, अशी टीका अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव न घेता आज केली. त्याचवेळी त्यात मुख्यमंत्र्यांचे नावही त्यांनी घेतले. मुख्यमंत्र्यांविषयी माझ्या मनात आदर आहे पण माझ्यावर आणि माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर टीका करणे हाच जर एखाद्याचा एक कलमी कार्यक्रम असेल आणि हा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली लपवला जात असेल तर मग मला पुढचं बोलावं लागेल. उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्रिपदावर बसले आहेत. पवारांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे ही गोष्ट तुम्ही विसरू नका. राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आहे. तेव्हा स्वत:च्या स्वार्थासाठी त्याला नख लावण्याचा कुणी प्रयत्न करू नये, अशी सडेतोड विधाने कोल्हे यांनी केली होती. त्यामुळेच शिवसेनेतून त्यावर तीव्र शब्दांत पलटवार करण्यात आला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times