आयर्लंडमधील स्टील्स टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हा थरार पाहायला मिळाला. क्रेगाघो आणि बालीमेना या दोन संघात हा सामना झाला. शेवटच्या षटकात ३५ धावा हव्या होत्या. आयर्लंडच्या एका फलंदाजाने हा कारनामा करून दाखवला आहे. बालीमेनाचा कर्णधार जॉन ग्लासने सलग सहा षटकार ठोकत आपल्या संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
षटकारांचा पाऊसआयर्लंडमधील नॉर्दर्न आयरिश क्रिकेट युनियनतर्फे लगान व्हॅली स्टील टी-20 स्पर्धा भरविण्यात येते. सामना जिंकण्यासाठी बालिमेना क्लबला शेवटच्या षटकात 35 धावांची आवश्यकता होती आणि बालिमेनाचा कर्णधार जॉन ग्लास ५१ धावा काढून क्रीजवर उभा होता. शेवटच्या षटकातील प्रत्येक चेंडूवर जॉनने षटकार ठोकत संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. 87 धावांसह नाबाद राहिलेल्या जॉनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
त्याआधी जॉनचा भाऊ सॅम ग्लासने शानदार गोलंदाजी करत हॅट्ट्रिक नोंदवली होती. त्याने क्रेगाघोचे फलंदाज जॉन मूरी, जे हंटर आणि कर्णधार अॅरोन जॉनस्टोन यांना एकापाठोपाठ एक बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. हंटर आणि जॉन मूरी यांच्या खेळीच्या बळावर क्रेगाघोने 7 बाद 147 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बालिमेनाची सुरवात खराब झाली होती. १९ व्या षटकात ७ बाद ११३ अशी धावसंख्या झाली होती आणि संघाला जिंकण्यासाठी सहा चेंडूत 35 धावांची गरज होती. त्यावेळी जॉन ग्लासने षटकारांचा पाऊस पाडत बालिमेनाला विजय मिळवून दिला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त तीन खेळाडूंनी सलग सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 2007 साली दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सने, त्याचवर्षी टी-20 विश्वचषकात भारताच्या युवराज सिंगने तर २०२१मध्ये वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डने असा पराक्रम केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times