: तालुक्यातील दातपाडी येथे एका विवाहितेला मुलगी झाली म्हणून पती व नणंदेने तिच्या अंगावर तेल ओतून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेत पीडित महिला ८० टक्के भाजल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर तिला सेवाग्राम येथे नेण्यात आले, परंतु उपचारा दरम्यान तिचा शनिवार, १७ जुलै रोजी मृत्यू झाला. मोनिका गणेश पवार असं जाळण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे.

सदर महिलेने ४ जुलै रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. मुलीला जन्म का दिला, या कारणावरून तिची नणंद कांता संजय राठोड हिने तिच्याशी कडाक्याचं भांडण केले. परंतु मोनिकाने या भांडणाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर काही वेळाने मोनिका ही बाथरूमला गेली असता पती गणेश पवार व नणंद कांता हिने तिच्या अंगावर तेल टाकून पेटवून दिले. त्यात मोनिका ही ८० टक्के भाजली, त्या अवस्थेत मोनिकाला उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र शनिवार, १७ जुलैच्या रात्री तिने प्राण सोडले.

मोनिकाला एक चार वर्षाचा मुलगा असून, १४ दिवसाची मुलगी आहे.

सदर घटनेची माहिती पांढरकवडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसंच पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील व पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत चापाईतकर करत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here