प्रवाशांना स्वस्त भाड्याने सायकल मिळावी म्हणून मेट्रो-१ प्रशासनाने MyByk अॅपबरोबर करार केला आहे. त्यामुळे या अॅपवरून स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच प्रवासी सायकल बुक करू शकतात. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा जागृतीनगर स्टेशनवर सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर इतर स्थानकांवर ही सेवा देण्याचा विचार असल्याचं मेट्रो-१च्या प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
प्रवाशांना ही सायकल दोन रुपये तासाने भाड्याने घ्यायची असेल तर आधी त्यांनी MyByk अॅप डाऊनलोड करावा लागेल. त्यानंतर स्वत:ची प्रोफाइल तायर करून त्यात ५०० रुपये डिपॉझिट भरावे लागेल. त्यानंतर प्रवाशांना सायकल बुक करताच मिळणार आहे. विशेष म्हणजे प्रवासी अधिक काळासाठीही सायकल स्वत:जवळ ठेवू शकतात. सकाळी सायकल भाड्याने घेतल्यावर ऑफिसच्या बाहेर सायकल पार्क करून संध्याकाळी पुन्हा सायकल स्टँडवर सायकल परत करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. सिनेमाला जाणारे किंवा शॉपिंगसाठी मॉलमध्ये जाणारेही सिनेमासंपेपर्यंत किंवा शॉपिंग होईपर्यंत सायकल स्वत:जवळ ठेवू शकतात. कार्यालयीन कामकाजाची वेळ ८ ते १० तास असल्याने प्रवासी ९ तास सायकल स्वत:जवळ ठेवू शकतो. त्यासाठी त्याला अवघे १८ रुपये मोजावे लागणार आहेत. भविष्यात मेट्रो स्टेशनसह व्यावसायिक अस्थापना आणि शिक्षण संस्थांच्या ठिकाणीही सायकल स्टॅंड बनविण्यात येणार आहेत. घाटकोपर-वर्सोवा दरम्यान मेट्रो-१ धावत असून या मार्गावर दररोज २ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times