सोलापूर : माढा सबजेलमधून चार अट्टल कैद्यांनी आज सोमवारी सकाळी पलायन केलं आहे. सर्व पलायनकर्ते कैदी हे विविध गंभीर गुन्ह्यांची शिक्षा भोगत होते. पळून गेलेल्या कैद्यांच्या तपासासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांची पथके रवाना झाली असून त्यांच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये शोध घेण्यात येत आहे.

आज सकाळी अकबर सिध्दपा पवार या कैद्याने आजारी पडल्याचा बहाणा केला. त्यावेळी ड्युटीवरील गार्डने त्याला उपचारासाठी बाहेर काढत असताना इतर तिघे माढा सब जेलमधून सिद्धयेश्वर शिवाजी केचे, आकाश उर्फ अक्षय रॉकी भालेकर आणि तानाजी नागनाथ लोकरे या तिघांनी ड्युटीवरील गार्डला धक्का मारून माढा सब जेलमधून पलायन केले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व कैदी खून, बनावट चलनी नोटा, पोक्सो, बेकायदेशीर हत्यार बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. या चार जनांपैकी दोघे कुर्डुवाडी तर दोघेजण टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल झालेले आहेत.

माढा तहसीलच्या आवारातच माढा पोलिसांचं सबजेल आहे. या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. मात्र, सकाळी या परिसरात शुकशुकाट असल्याचा फायदा या अट्टल गुन्हेगारांनी उचलला. त्यामुळं सोलापूर ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे आषाढी वारी बंदोबस्ताचा ताण पोलिसांवर असताना माढा सबजेलमधील कैद्यांनी पलायन करत सोलापूर ग्रामीण पोलिसांना गुंगारा दिला आहे.

पलायनकर्त्या कैद्यांच्या शोधासाठी पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी केली असून आजूबाजूच्या जिल्ह्यातही तपास पथके रवाना केली आहेत. या कैद्यांचे फोटोही इतर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here