करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार नियमांचे पालन करत आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मानाच्या पालख्यांचे पंढरपुरात आगमन झाले.
मोजक्या वारकरी बांधवासह माऊलीच्या पवित्र पादुका घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळाने ” शिवशाही ” बस पुरवल्या होत्या. आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी, देहू येथून संत तुकारामांची पालखी, सासवडवरून संत सोपान काकांची पालखी, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची पालखी ,मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाईची पालखी, पैठण येथून संत एकनाथांची पालखी, पिंपळनेर- पारनेर येथून संत निळोबारायांची पालखी कौंडिण्यपुर(अमरावती) येथून रुक्मिणी माता यांची पालखी व पंढरपूर येथून संत नामदेव महाराज यांची पालखी अशा दहा श्री क्षेत्र पंढरपूर येथे सुरक्षित पोहोचल्या.
वाखरी पालखी तळावर या सर्व पालख्यांचे स्वागत करण्यात आले. या परिसरात पालख्यांचे आगमन होताच सर्व परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला.
मानाच्या पालख्यांच्या स्वागतासाठी पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, पंढरपूर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, वाखरीच्या सरपंच श्रीमती कविता पोरे आदींसह मंदिरे समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times