कोल्हापूर जिल्ह्यातील मागील १०० दिवसाच्या प्रदीर्घ लॉकडाऊनमध्ये ५ दिवस अपवाद वगळता जीवनाश्यक श्रेणी व्यतिरीक्त इतर व्यापार बंद होते. यामुळे व्यापारी आर्थिक अरीष्टात सापडले, सातत्याने मागणी करूनही दुकाने सुरू करण्याचा निर्णय होत नसल्याने शेवटी व्यापार्यांनी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ च्या मार्गदर्शनाखाली तीव्र संघर्ष केला. त्यामुळे शेवटी पॉझिटिव्हिटी दर दहा टक्क्यांपेक्षा कमी आल्यानंतर सरसकट सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार सोमवारी सकाळी दुकाने उघडण्यात आली.
व्यापाऱ्यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर साहजिकच व्यापार्यांच्यात उत्साह होता. व्यापाऱ्यांनी उत्साहाबरोबर सामाजिक जबाबदारीचेही भान ठेवले. सकाळी व्यापार सुरू करताना पारंपारीक पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीतून सनई चौघड्याच्या मंजुळ स्वरासह प्रबोधन रॅली काढली. या रॅलीमधून मास्कशिवाय प्रवेश नाही यासह, करोना प्रतिबंधक चतुसुत्रीचे व्यापारी व नागरिकांना प्रबोधन करण्यात आले.
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ चे वरीष्ठ उपाध्यक्ष व ‘राजारामपुरी व्यापारी असोसिएशन’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले की, जनतेत लसीकरणाबाबत जागृती व प्रोत्साहन मिळावे यासाठी लसीकरण करून घेतलेल्या ग्राहकांना राजारामपुरीतील सर्व प्रमुख शोरूम्स व दुकानांमधून विशेष डिस्काउंट देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे ७२ तासाच्या आतील निगेटीव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट असेल त्यांनाही ही सवलत दिली जाईल. यावेळी सेक्रेटरी रणजित पारेख, प्रताप पोवार, प्रशांत पोकळे, श्याम बासराणी, अनिल पिंजाणी, दिपक पुरोहीत, अभिजित गुजर, गजानन पवार, महेश जेवरानी, सतीश माने, भरत रावळ, दर्शन गांधी, रहीम सनदी यांच्यासह राजारामपुरी परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times