विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळाने नव्या मंत्र्यांचा परिचय संसदेच्या दोन्ही सभागृहात देता न आल्याने पंतप्रधान मोदींनी नाराजी व्यक्त केली. विरोधकांच्या महिला, आदिवासी आणि दलितविरोधी मानसिकता हे गोंधळाचं कारण आहे. नवीन मंत्री या समाजातून आले आहेत. संसदेत नव्या मंत्र्यांचा परिचय करून देणं ही जुनी परंपरा आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना शांत करण्याचा करण्याच प्रयत्न केला. परंपरा तोडू नका. आपण दीर्घकाळ सरकारमध्ये होता. परंपरा मोडून सभागृहाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवू नका, असं ओम बिर्ला म्हणाले. दुसरीकडे विरोधकांच्या घोषणाबाजीत पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर निशाणा साधला. महिला खासदार मोठ्या संख्येत मंत्री झाल्याने सभागृहात उत्साहाचं वातावरण असेल, असं मला वाटलं होतं. आदिवासी साथीदार मंत्री झाल्याने आनंदाचं वातावरण असेल असं वाटलं होतं. शेतकरी, ग्रामीण, मागास आणि ओबीसी समाजातून येणारे प्रतिनिधी मंत्री झाल्याने आनंद व्हायला हवा होता. पण अनेकांच्या हे पचनी पडले नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. यानंतर पंतप्रधान मोदींनी अध्यक्षांच्या सूचनेवरून नव्या मंत्र्यांची यादी सभागृहाच्या पटलावर सादर केली.
परंपरा मोडल्याने राजनाथ सिंहाकडून खेद
पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. यात ४३ मंत्र्यांचा शपथविधी झाला. यात १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्री झाले. या नव्या मंत्र्यांच्या परियच करून देताना काँग्रेस खासदारांनी घातलेल्या गोंधळाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी खेद व्यक्त केला. अशा प्रकारचा गोंधळ हा दुःखद आणि दुर्दैवी आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले. विरोधकांच्या गदारोळाने राज्यसभेतही नव्या मंत्र्यांचा परिचय करून देता आला नाही.
विरोधकांनीही बोलावली बैठक
संसदेत सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनीही बैठक बोलावली आहे. विरोधी पक्षांनी मंगळवारी सकाळी १० वाजता रणनीती आखण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत इस्रायलच्या पिगासस स्पायवेअरद्वारे होणाऱ्या हेरगिरीच्या आरोपांवरून सरकारला घेरण्याची रणनीती आखली जाईल. विरोधी पक्षांनी या प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. हेरगिरी प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा. तसंच पंतप्रधा नोदींच्या भूमिकेचीही चौकशी केली जावी, अशी मागणी काँग्रेसने पत्रकार परिषदेतून केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times