मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात येताच अदानी यांनी कंपनीचे मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. मुंबईचे हे विमानतळ आता पूर्णपणे ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’च्या (एएएचएल) ताब्यात गेले आहे. त्याबरोबर एएएचएलचे मुख्यालय मुंबईतून हलविण्यात आले आहे.
संकटात आलेल्या जीव्हीकेकडून अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा (मिआल) ताबा स्वत:कडे घेतला आहे. याबरोबर येऊ घातलेल्या व बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबई विमानतळाचा ताबाही एएचएलकडे गेला आहे. मुंबईचे विमानतळ खरेदी होईपर्यंत एएएचएलने मुंबईत मुख्यालय थाटले होते. पण खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन व्यवस्थापन पूर्ण होताच मुंबईतील गाशा गुंडाळत मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. यामुळे मुंबईतून गुजरातकडे जाणाऱ्या उद्योगात आणखी एक भर पडली आहे.
देशभरातील अन्य सहा विमानतळांचे नूतनीकरण व त्याचा ताबा एएएचएलकडे आहे. त्यामध्ये मुंबईच्या विमानतळाची भर पडताच अदानी समूहाने विमानतळ उद्योगाला नव्याने बळ दिले आहे. त्याअंतर्गत अनेक महत्त्वाच्या नियुक्त्या त्यांनी केल्या आहेत. आजवर ‘मिआल’चे सीईओ या नात्याने यशस्वीपणे कार्य करणारे आर. के. जैन यांच्याकडे एएएचएलच्या अखत्यारितील सर्व विमानतळांचे ‘सीईओ’ म्हणून कार्यभार सोपवला आहे. तर ‘मिआल’चे सध्याचे सीईओ बेन झॅन्डी यांच्याकडे एएएचएलअंतर्गत बिगर हवाई विभागाचे ‘सीईओ’ हा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर आता एएएचएलचे परिचालन अध्यक्ष ‘मिआल’चे सीईओ असतील. अदानी बंदरे व एसईझेडचे संचालक बीव्हीजेके शर्मा यांच्याकडे आता नवी मुंबई विमानतळाचे ‘सीईओ’ ही धुरा असेल.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times