घरोघरी लसीकरणाच्या मुद्द्यावर सुरुवातीपासून उच्च न्यायालयाने आग्रही भूमिका घेतली होती. घरोघरी लसीकरणाचा गांभीर्यांने विचार करा, अशा सूचना न्यायालयाने मुंबई महापालिका व राज्य सरकारला दिल्या होत्या. त्यानंतर मुंबई महापालिकेनं अशी मोहिम सुरु करण्याची तयारी दर्शवली व त्यानुसार पालिकेनं तयारीही सुरु केली होती.
मुंबई उच्च न्यायालयात आज करोना विषयक याचिकांवर सुनावणी झाली. त्यावेळी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी १ ऑगस्टपासून मुंबईत घरोघरी लसीकरण सुरु करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. तसंच, या लसी महापालिकेतर्फे देण्यात येणार असून त्या मोफत असणार आहेत, अशी माहिती पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अॅड. अनिल साखरे यांनी दिली.
घरोघरी लसीकरणाची सुरुवात पुण्यातून सुरू होणार असल्याची माहिती याआधी देण्यात आली होती. मात्र, आता घरात जाऊन लस देण्याचा पथदर्शी प्रकल्प आम्ही मुंबईत करू, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिली आहे.
वाचाः
वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन प्रतिसाद मागवल्यानंतर मुंबईत तीन हजार पाचशे पाच जणांनी प्रतिसाद दिला आहे. हा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे मुंबईतून हा उपक्रम सुरू करण्यात येईल, महाधिवक्ता कुंभकोणी आणि मुंबई महापालिकेचे वकिल अनिल साखरे यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली माहिती.
न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
घरोघरी लसीकरणाविषयी केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही पण राज्य सरकारने घेतली. अखेर राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वांचा प्रारुप आराखडा दिला आणि आता प्रत्यक्षात ही मोहीम सुरू होईल, हे समाधानकारक आहे, खंडपीठाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांविषयी प्रशंसा व्यक्त करताना महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे.
वाचाः
दरम्यान, अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पालिकेनं एक ईमेल आयडी तयार केला असून यावर गरजूंनी माहिती पाठवावी असं आवाहन केलं आहे. या माहितीच्या आधारे पालिका टप्प्याटप्प्याने या गटातील नागरिकांचे लसीकरण करणार आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times