कोल्हापूर परिसरात गेले काही दिवस पावसाची विश्रांती होती. आता हळूहळू पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर आहे. यामुळे पंचगंगेसह सर्वच नंद्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेचे पाणी ३० फुटापर्यंत पोहोचले आहे. यामुळे जिल्ह्यातील १५ बंधारे पाण्याखाली गेल्याने काही रस्ते वाहतुकीस बंद झाले आहेत. दमदार पाऊस नसला तरी संततधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठाही वाढत आहे.
येत्या दोन दिवसात जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. या काळात अतिपाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषता चंदगड, आजरा, राधानगरी शाहूवाडी,पन्हाळा, गगनबावडा व भुदरगड या तालुक्यात तुफान पावसाची शक्यता आहे. असा पाऊस झाल्यास नदी पात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच डोंगराळ भागामध्ये भूस्खलन अथवा दरडी कोसळणे तसेच गावठाणातील जुन्या घरांची पडझड होणे या सारख्या घटना संभावत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास, त्याच्या निवारणासाठी सज्ज रहावे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.
जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली महाराणी ताराराणी सभागृहात आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध विभागांच्या प्रमुखांनी अतिवृष्टी, पूरपरिस्थिती निवारण व मदतकार्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times