नगर: चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएमचे माजी आमदार यांच्या निषेधार्थ शिवसेना आणि भाजपने जोरदार निदर्शने केली. दोन्ही पक्षाने केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनात वारिस पठाण यांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहनही करण्यात आलं.

शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार अनिल रोठाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी वारिस पठाण यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. वारिस पठाण मुर्दाबाद, वारिस को पाकिस्तान भेज दो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिवसैनिकांनी पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन केले. यावेळी महिला शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

तर, भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयावर दुचाकी मोर्चा काढून पठाण यांचा निषेध नोंदवला. भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच पोठाण यांच्या प्रतिमेला चपला मारून या प्रतिमेचं दहन केलं. पठाण यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या दोन्ही आंदोलनावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा: दानवे

जालन्यातही भाजपने पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. वारिस पठाण हे बेताल वक्तव्य करणारे गडी आहेत. तशी त्यांची ओळख असल्यानेच लोकांनी त्यांना बाजूला बसवले आहे, असं सांगत त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी भाजपचे जालना जिल्हाध्यक्ष आणि आमदार संतोष दानवे यांनी केली. संतोष दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. यावेळी त्यांनी जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्यावरही टीका केली. पालकमंत्र्यांनी अद्याप कामच सुरू केलं नाही. सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले, पण मंत्रीमहोदय सत्कार सोहळ्यातच मश्गुल आहेत, अशी टीका दानवे यांनी केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here